नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद झाल्यापासून म्हणजे 18 मार्च पासून एक जर्मन नागरीक दिल्लीच्या विमानतळावरच राहात असल्याचे आढळून आले आहे. हा इसम हनोईहून इस्तानबुलला चालला होता. त्याचे विमान दिल्ली मार्ग होते. तो या विमानाने 18 मार्च रोजी दिल्लीला आला असतानाच विमान वाहतूक बंद करण्यात आली होती.
त्यामुळे तो दिल्लीच्या टर्मिनल 3 वर ट्रान्झिट एरियातच थांबून आहे. जर्मनीत त्याच्या विरोधात काही गुन्हे दाखल असल्याने त्याला जर्मनीत परत जायचे नाही. त्यामुळे तो विमान सेवा सुरू होईपर्यंत तिथेच थांबणार आहे. त्याला विमान तळावरील अधिकारी अन्न आणि अन्य मदत करीत आहेत. त्याच्या अस्तित्वाची माहिती विमान वाहतूक मंत्रालय आणि जर्मन दुतावासाला देण्यात आली आहे. तसेच विमान तळावरील अधिकारीही त्याच्या नित्य संपर्कात आहेत. आता त्याच्या विषयी नागरी विमान वाहतूक मंत्रालयच योग्य निर्णय घेतील तो पर्यंत तरी त्याचा मुक्काम येथेच असणार आहे.