जर्मन बेकरी बॉम्बस्फोट : मुख्य आरोपी यासीन भटकळ याच्यावर आरोप निश्‍चिती

तब्बल 5 वर्षाच्या कालावधीनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात करण्यात आले

पुणे – जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी आणि इंडियन मुजाहिद्दीनचा संस्थापक, कुख्यात दहशतवादी यासीन भटकळ उर्फ शिवानंद (रा. भटकळ, जि. उत्तर कनडा, कर्नाटक) याला सोमवारी (29एप्रिल) विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्यावर आरोप निश्‍चिती करण्यात आली. सुमारे पाच वर्षांपूर्वी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. सुमारे 75 हून अधिक तारखांना तो गैरहजर होता.

कोरेगावपार्क येथील जर्मन बेकरी येथे 13 फेब्रुवारी 2010 रोजी सायंकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी झालेल्या बॉम्बस्फोटात 17 व्यक्तींचा मृत्यू झाला होता. तर तब्बल 56 लोक गंभीर जखमी झाले होते. मृतांमध्ये 5 आणि जखमींमध्ये 10 परदेशी नागरिकांचा समावेश होता. याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास एटीएसकडे सोपविण्यात आला होता. दरम्यान, एटीएसने केलेल्या तपासात गुन्ह्यात वापरलेल्या स्फोटामध्ये आरडीएक्‍स या स्फोटकाचा वापर केला असल्याचे निष्पन्न झाले होते. जर्मन बेकरी या गुन्ह्याच्या ठिकाणी यासीन भटकळ यानेच बॉम्ब ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हा केल्यापासून तो फरारी होता. इंटेलिजन्स ब्युरो आणि रॉ यांनी संयुक्तपणे कारवाई करताना यासिनला नेपाळच्या सीमेवरुन सौनाली या गावातून अटक केली होती. त्याचा ताबा 13 मार्च 2014 रोजी एटीएसकडे सोपविल्यानंतर त्याला याप्रकरणी 14 मार्च 2014 रोजी पुणे येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. सध्या भटकळ याच्यावर जर्मन बेकरी स्फोट प्रकरणी 22 ऑगस्ट 2014 नंतर 75 हुन अधिक न्यायालयीन सुनावण्यांना तो हजर राहिला नाही. या दरम्यान पाच वर्षाचा कालावधी उलटला आहे.

पुणे, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, सुरत, वाराणसी या शहरांमध्ये झालेल्या बॉंबस्फोटांमध्ये यासिन भटकळ आणि त्याच्या साथीदारांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणात मिर्झा हिमायत इनायत बेग उर्फ अहमद बेग इनायत मिर्झा उर्फ यूसूफ याचा सहभाग असल्याने त्याला 7 सप्टेंबर 2010 रोजी या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्याला याप्रकरणी सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. परंतु, उच्च न्यायालयात त्याची फाशीची शिक्षा कमी केली आहे.


तिहार कारागृहातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्याची सरकारी पक्षाची मागणी
यासीन भटकळ याच्या सुरक्षेच्या कारणावरून सरकारी पक्षाने तिहार कारागृहातून त्याला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्याची मागणी केली. त्याला यासीनचे वकील जहिरखान पठाण यांनी विरोध केला. त्याला न्यायालयात हजर करूनच खटल्याची सुनावणी सुरू करण्याची मागणी ऍड. पठाण यांनी केली. तसा अर्जही न्यायालयात सादर केला आहे. यावर 15 मे रोजी सुनावणी होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.