“गावकी’ सरपंचाच्या प्रतीक्षेत

पाबळमध्ये मिळणार भावकीला संधी : विद्यमान उपसरपंचाकडे गावचा कारभार

पाबळ – पाबळ ग्रामपंचायतीचे सरपंच पद रिक्त झाल्याने पुढील सरपंच निवड होईपर्यंत विद्यमान उपसरपंचांकडे तात्पुरता कार्यभार सुपूर्द करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांनी “आधी भावकीचे बघू मग गावकीचे’ असे सूचक विधान ग्रामपंचायत सदस्या शकुंतला कोल्हे यांच्या पक्ष प्रवेशावेळी केले होते. त्या पार्श्‍वभूमीवर डॉ. अमोल कोल्हे यांची खासदारपदी निवड झाली असल्याने आता गावच्या सरपंचपदी आपली निवड व्हावी यासाठी शकुंतला कोल्हे प्रतीक्षेत आहेत. या पार्श्‍वभूमीवर नवीन सरपंचपदी कोणाची निवड होणार याकडे पाबळ ग्रामस्थांचे लक्ष्य लागले आहे.

2015 साली झालेल्या सतरा सदस्यीय पाबळ ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे अकरा तर राष्ट्रवादीचे सहा सदस्य निवडून आल्याने शिवसेनेची सत्ता स्थापन झाली होती तर पहिल्या दोन सत्रात सुलभा पिंगळे व मनीषा बगाटे यांनी सव्वा वर्ष सरपंच पद भूषविले होते. दरम्यान, तिसऱ्या वेळी शकुंतला कोल्हे यांची अंर्तगत समझोत्यानुसार निवड नियोजित असताना रोहिणी जाधव यांनी कुणबी जातीच्या प्रमाणपत्रावर निवडणूक लढवून सरपंच पद मिळवले होते. त्या वेळी शकुंतला कोल्हे यांनी खुल्या गटातून निवडून आलेल्या व कुणबी प्रमाणवर सरपंचपदी विराजमान झालेल्या जाधव यांच्या निवडीवर आक्षेप घेत जात पडताळणी समितीकडे दाद मागितली होती.

तर जातपडताळणी समितीने रोहिणी जाधव यांचे प्रमाणपत्र अवैध ठरवून त्यांचे पद रद्द केले होते. त्याआधारे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी रोहिणी जाधव यांची निवड 20 मार्च 2019 रोजी रद्द केली होती. या पार्श्‍वभूमीवर येऊ घातलेल्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाल्यांनतर पाबळ येथील राष्ट्रवादीच्या सभेत शकुंतला कोल्हे यांनी खासदार कोल्हे, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, मंगलदास बांदल व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत चार ग्रामपंचायत सदस्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांनी आधी भावकीचे बघू मग गावकीचे असे सूचक विधान शकुंतला कोल्हे यांचा सत्कार करताना केले होते. त्या पार्श्‍वभूमीवर डॉ. कोल्हे यांची खासदार पदी निवड झाली असल्याने गावच्या सरपंचपदी आपली निवड व्हावी यासाठी शकुंतला कोल्हे प्रतीक्षेत आहेत.

पाबळ गावात ग्रामदैवत भैरवनाथ देवाला स्मरून सार्वजनिक निर्णय घेतले जातात. त्या निर्णयाचा जो अवमान करतो त्याला सार्वजनिक जीवनात मोठी किंमत मोजावी लागते. हा नाथ साहेबांचाच न्याय आहे. सरपंच पद इतर मागासवर्गीयासाठी राखीव असताना सत्तेसाठी बोगस कागदपत्रांची मदत घेत मला डावलून ज्यांनी सरपंच पद मिळवले त्यांच्या विरोधात झालेला निकाल देऊन नाथसाहेबांनीच न्याय दिला आहे. यापुढे कोणीही असा अन्याय करू नये, यासाठी मी जाधव यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे.

शकुंतला कोल्हे, ग्रामपंचायत सदस्या पाबळ
पाबळ ग्रामपंचायतीमध्ये सुरवातीला जो काही निर्णय झाला होता, त्यामध्ये सरपंचपद सर्वांनी विभागून घ्यायचे ठरले होते. मात्र त्यांनी नाथसाहेबांचा अंगारा उचलूनही कोल्हे यांना पद दिले नाही.
– सविता बगाटे, जिल्हा परिषद सदस्या

Leave A Reply

Your email address will not be published.