मुंबई – गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राजभर एका नावाची खूप चर्चा आहे. ते नाव म्हणजे ‘गौतमी पाटील’. दुकानाचं उदघाटन असो वा एखाद्याचा जन्म दिवस गौतमीच्या कार्यक्रमाशिवाय सेलिब्रेशन पुढे जातच नाही. गौतमीचा कार्यक्रम म्हणजे मोठी पब्लिसिटी, मोठी गर्दी आणि मोठा खर्च. कॉलेजवयीन तरुणाईपासून ते नोकरदार वर्गापर्यंतच्या प्रत्येकाला गौतमीच्या नृत्याची भुरळ पडते. कमी वेळात ती प्रसिद्धीच्या खूप उंच शिखरावर पोहोचली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच गौतमी पाटीलसोबत एक अनपेक्षित प्रकार घडला होता. तिला नकळत तिचा कपडे बदलत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. सध्या पोलीस अधिकाऱ्यांकडून या व्हायरल व्हिडिओचा तपास सुरु असून, म्हणावे असे ठोस पुरावे आणि माहिती समोर आलेली नाही.
तर, दुसरीकडे आता शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी जलद गतीने तपास करत संशयितांना अटकही केलीय. मात्र, गौतमीच्या प्रकरणाचा अद्यापही तपास सुरूच आहे. आणि आता हाच धागा पकडून ठाकरे गटाचे युवा सेना राज्य विस्तारक शरद कोळी यांनी एक सवाल उपस्थित केला आहे. त्यामुळे आता गौतमी पाटीलच्या देखील नावाची महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री झाल्याचं सांगण्यात येत आहे. स्वतः गौतमी राजकारणात कधी येणार तर नाहीच. पण सध्या तिच्या नावाची मात्र चर्चा होताना दिसत आहे.
यावेळी बोलताना शरद कोळी म्हणाले, “शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओमुळे विधानसभा बंद पाडता. मग डान्सर गौतमी पाटील यांच्यासाठी अशी भूमिका का घेत नाही? शीतल म्हात्रे यांच्या व्यतिरिक्त उर्वरीत महिला या भगिनी नाहीत का? त्यांना इज्जत नाही का? इज्जत फक्त तुमच्या बरोबर राहणाऱ्या व्यक्तीलाच आहे का? याचा अर्थ तुम्ही पक्षापात करत आहात..’ असा सवाल शरद कोळी यांनी उपस्थित केला आहे. तसेच पुढे म्हणाले, “शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे ही एकच महिला राज्यामध्ये आहे का? अन्य महिलांवरती अत्याचार होतात. त्यावरती राज्य सरकार का लक्ष देत नाही?” असं टीका देखील त्यांनी यावेळी केली.