जोहान्सबर्ग – विषारी नायट्रेट वायूच्या गळतीमुळे दक्षिण आफ्रिकेमध्ये किमान 16 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 3 लहान मुलांचाही समावेश आहे. बेकायदेशीर खाण कामगारांकडून जवळच्याच धातूच्या झोपड्यांमध्ये सोन्याच्या शुद्धीकरणासाठी या वायूचा वापर केला जात असतो. तेथेच ही वायू गळती झाल्याचे दक्षिण आफ्रिकेच्या पोलिसांनी बुधवारी संध्याकाळी सांगितले.
जोहान्सबर्गच्या पूर्वेकडील अँजेलो बोक्सबर्ग येथे ही वायू गळती झाली आणि त्यामध्ये किमान 24 जणांचा मृत्यू झाल्याची घोषणा दक्षिण आफ्रिकेच्या आपत्कालिन विभागाने आगोदर जाहीर केले होते. मात्र मृतदेहांची मोजणी केल्यावर एकूण 16 जणांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले.
ही वायू गळती रात्रीच्या सुमारास झाली. त्यामुळे आणखीन कोणाचा मृत्यू झाला असल्याच्या शक्यतेने शोधकार्य सुरू आहे. संध्याकाळी 8 वाजता वायू गळती झाली होती. मात्र तपासासाठी पाचारण करण्यात आलेल्याफॉरेन्सिक पथक आणि पॅथोलॉजिस्टचे पथक रात्री 3 वाजेपर्यंत पोचू न शकल्यामुळे सर्व मृतदेह जागेवरच पडून राहिले होते, असे आपत्कालिन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दोघाजणांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वायू गळती झालेल्या झोपड्यांपासून 100 मीटरचा परिसर रिकामा करण्यात आला आहे.
बोक्सबर्ग शहरामध्ये क्रिसमसच्या संध्याकाळी “एलपीजी’ची वाहूत करणारा एक ट्रक एका पूलाला धडकून झालेल्या स्फोटामध्ये 41 जणांचा मृत्यू झाला होता.