ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पडल्याचे चित्र ः डेपोतील प्रोसेसर बिघडला
नगर – कचरा डेपोला आग लागल्याने ती आटोक्यात आणता आणता अग्नीशमनदलाला दोन दिवस लागले. काल रात्री उशिरा आग आटोक्यात आणण्यात यश आले. आज कचरा डेपोचे प्रोसेसिंग युनिट वगळता अन्य कचरा डेपो पुर्ववत करण्यात प्रशासनाला यश ओले. त्यामुळे आज कचरा संकलन सुरू करण्यात आले आहे. आज दुपार पर्यंत 40 ते 45 गाड्या कचरा डेपोत नेवून टाकण्यात आला.त्यामुळे शहर परिसरात कचराच कचरा चोहीकडे असे चित्र आज पाहायला मिळाले.
दरम्यान शहर व उपनगरात दररोज पडणारा 100 ते 120टन कचरा गेले दोन दिवसा पासून तसाच पडूुन राहिल्याने अनेक कचरा कुंड्या अक्षरशः ओसंडून वाहताना पहायला मिळाल्या.एरवी सुद्धा पडणाऱ्या कचऱ्यापैकी संपूर्ण कचरा उचलला जात नाही.20 ते25 टन कचरा रोज तसाच पडून राहतो. मात्र आता दोन दिवस कचरा संकलन न झाल्याने 200 ते 250 टन कचरा साठला असून अजून दोन दिवस तरी सर्व कचऱ्याच्या संकलनासाठी लागणार आहेत.अशी माहिती मनपा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. गावातून घंटागाड्या फिरवून जो कचरा गोळा केला जातो तो कचरा गाड्यात भरून आकाशवाणी शेजारील क्रीडा संकुलात त्या गाड्या उभ्या करण्यात आल्या होत्या.
शहर व उपनगरातील सुमारे 122 कचरा कुंड्यातून कचरा संकलित करण्यासाठी लागणारी सामग्री अपुरी असल्याने रोज संपूर्ण कचरा उचलला जात नाही त्यामुळे काही ठिकाणी दिवस आड कचरा संकलित केला जातो. सध्या मनपाकडून हा कचरा उचलण्यासाठी 30 च्या आसपास घंटागाड्या असून 9 ट्रॅक्टर आणि 4 ट्रक आहेत. त्यांच्याच फेऱ्यांचे नियोजन करून कचरा संकलन सध्या सुरू आहे.
या शिवाय 1 कॉम्पॅक्टर आणि 2 कंटेनर प्लेसर सुद्धा या कामासाठी वापरले जातात. याशिवाय ठेकेदाराचे 16 ट्रॅक्टरही कचरा संकलनाच्या कामात व्यस्त आहेत. परवा लागलेल्या आगीत कचरा डेपोतील खत निर्मिती करणारा प्रोसेसरचे मोठे नुकसान झाले असून तो दुरुस्त होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागणार आहे. मात्र तोपर्यंत कचरा संकलनच सुरू राहणार असल्याचे मनपाचे सारसर यांनी सांगितले.