लोणावळा :”गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात सोमवारी सर्वत्र गणपती बाप्पाचे आगमन उत्साहात झाले. सकाळच्या सत्रात ढोल, ताशे यांच्या गाजरात घरगुती गणेशमूर्ती घेऊन जाणारे कार्यकर्ते दुपारी जेव्हा आपल्या सार्वजनिक मंडळाच्या मूर्ती आणायला बाहेर पडले, तेव्हा मात्र त्यांना अधूनमधून हजेरी लावणाऱ्या पावसाने चांगलेच झोडपून काढले.
गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळपासूनच गणपती बाप्पा आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी आलेल्या अबालवृद्धांसह बालगोपाळांनी लोणावळा शहरातील मुख्य बाजारपेठ गजबजून गेली होती. गणेशमूर्ती विक्री केंद्रावर तसेच देखाव्याचे समान आणि हार, फुले, पूजेसाठी लागणारे साहित्य विक्रीला असलेल्या दुकानात ही गर्दी प्रामुख्याने दिसून येत होती. गणेशमूर्ती स्थापनेचा मुहूर्त हा सकाळपासूनच असल्याने अनेकांनी तर रविवारी रात्रीच आपापल्या मूर्ती घरी नेल्या होत्या.
गणेश आगमनाचा उत्साह शिगेला असतानाच मागील चार दिवसांपासून जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसाने सोमवारी देखील लोणावळा शहरात जोरदार हजेरी लावल्याने अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उत्साहावर पावसाने पाणी फिरले गेले. पावसाच्या पाण्यापासून आपल्या गणेश मूर्तीचा बचाव करून मूर्ती आपल्या घरापर्यंत तसेच मंडळाच्या मंडपापर्यंत घेऊन जाण्याची धडपड करताना नागरिक आणि गणेश मंडळ कार्यकर्ते करताना दिसून
येत होते.