मिरवणुकाही नाही : गणेश मंडळांचा निर्णय
पुणे – ‘गणेश मंडळांनी देखावे उभारू नयेत, मिरवणुका काढू नयेत, कमीतकमी जागेत मंडप उभारावेत’ असे निर्णय गुरुवारी महापालिकेत झालेल्या गणेश मंडळांच्या बैठकीत घेण्यात आले.
गणेशोत्सवाची पूर्वतयारी बैठक गुरुवारी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. दि.22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर कालावधीत असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळांनी घ्यायची खबरदारी आणि करोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे दायित्व याविषयी चर्चा करण्यात आली.
या बैठकीला उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, महापालिका अतिक्रमण नियंत्रण विभागप्रमुख माधव जगताप, घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख ज्ञानेश्वर मोळक, संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी, गणेश मंडळाचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते. महापौरांनी आवाहनाला देखील अनेक कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला आणि गुगल मीटद्वारे बैठकीस उपस्थिती लावली. साधारणतः 50 गणेशमंडळांनी गूगल मीटद्वारे सदर बैठकीला उपस्थिती दर्शवली.
‘राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून साधेपणाने उत्सव साजरा करावा, कमी उंचीच्या मूर्ती आणाव्यात, लहान आकाराचे मंडप असावेत जेणेकरून ऍम्ब्युलन्स आणि अन्य वाहनांना अडथळा निर्माण होणार नाही, शक्यतो देखावे उभारू नयेत, प्रतिष्ठापना आणि विसर्जन मिरवणुका काढू नयेत, मूर्ती विसर्जन मंडपालगतच हौद उभारून करावे, मागील वर्षीचेच मंडप आणि ध्वनी परवाने ग्राह्य धरण्यात येतील, कमीतकमी कार्यकर्त्यांची उपस्थिती असावी आणि गर्दी टाळावी, ऑनलाइन मूर्ती खरेदीवर भर द्यावा’ असे आवाहन या बैठकीत करण्यात आले. उत्सवादरम्यान सहकार्य करावे, असे आवाहन शिसवे यांनी केले. उपमहापौर शेंडगे यांनी आभार मानले.
गणेशोत्सवासंबंधी राज्याने जे निर्देश दिले आहेत, त्याचे आम्ही जरूर पालन करू. या आधीच आठ मानाच्या गणपतींनी या संदर्भात निर्णय घेतले होतेच. उत्सव साध्या पद्धतीनेच परंतु विधिपूर्वक पार पाडला जाईल, याची ग्वाही या आधीही दिली आहे. तसेच याबाबत येत्या सोमवारी वार्ताहर परिषदेत आणखी भूमिका जाहीर करू.
– पुनीत बालन, अध्यक्ष पुनीत बालन ग्रुप तथा स्वागताध्यक्ष, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ