प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 31 – गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष, आसमंतात घुमणारा पारंपरिक वाद्यवृंद व ढोल-ताशांचा दणदणाट, चौकाचौकांत काढण्यात आलेल्या आकर्षक रांगोळ्या, रंगीबेरंगी फुलांनी सजविण्यात आलेल्या पालख्या व रथात विराजमान झालेले बाप्पा, मिरवणूक मार्गावर भक्तांचे स्वागत करणाऱ्या रांगोळी व रांगोळींच्या पायघड्या, लाडक्या बाप्पाला मोबाइलमध्ये टिपण्यासाठी सरसावलेली तरुणाई, श्रींच्या जयघोषाने दुमदुमलेला आसमंत, पारंपरिक गणवेश परिधान करून मिरवणुकीत सहभागी झालेले भक्त अशा उत्साही व मंगलमय वातावरणात बुधवारी बाप्पांचे जल्लोषात आगमन झाले.
पोलिसांचा बंदोबस्त, दक्षता
गणेशोत्सवात कोणतेही संकट येऊ नये, यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आगमन मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस साध्या वेशात गस्त घालत होते. तर शहरातील महत्वाच्या चौकात पोलिसांच्या चौक्या उभारण्यात आल्या आहेत. बेलबाग चौकात परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे ह्या प्रत्यक्ष उपस्थित राहून पाहणी करत होत्या. तसेच वाहतूक पोलिसांकडून चौकाचौकात बॅरेकेटिंग करण्यात आले होते. त्यामुळे मध्यवर्ती पेठांमधील महत्वाच्या मार्गांवर वाहतूक कोडींची समस्या निर्माण झाली नव्हती. शहरातील विविध स्टॉलवरून मूर्ती घेऊन जाण्यासाठी आलेल्या नागरिकांसाठी वाहतूक पोलिसांनी वेगळी व्यवस्था करण्यात आली होती. तसेच मिरवणुकीमुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
विदेशी पाहुणे
गणेशोत्सवाची प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठी विदेशी पाहूण्यांनी याही वर्षी हजेरी लावली होती. शहरातील विविध गणपती मिरवणुकीत मोठ्या संख्येने विविध देशांतील पाहुण्यांनी सहभाग घेतला होता. मिरणुकीतील प्रत्येक क्षण मोबाईल आणि कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी विदेशी पाहुण्यांची धडपड दिसून येत होती. काही परदेशी पाहुण्यांनी पारंपरिक वेश परिधान केला होता. त्यामुळे त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
मोकळा श्वास
बुद्धीची देवता असलेल्या श्री गणरायाचे घराघरांमध्ये मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात आगमन झाले. दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा केला जात असल्याने यावर्षी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. करोनाचे सावट दूर झाल्याने यंदा मास्कची सक्ती नव्हती. त्यामुळे मोकळा श्वास घेत पुणेकरांनी मंगलमय वातावरणात भक्तीभावाने गणरायाचे स्वागत केले.
सिद्धार्थ जाधवची उपस्थिती
करोनामुळे सलग दोन वर्षे उत्सवावर असलेल्या निर्बंधावर मात करत यंदा गणेश मंडळांनी दिमाखात वाजत गाजत प्रतिष्ठापनेच्या मिरवणुका काढल्या. बुधवारी सकाळी निघालेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळांच्या मिरवणुकीत सहभागी “कलावंत ढोल ताशा’ पथकात सिद्धार्थ जाधव याने ढोल वाजवून मनसोक्त आंनद लुटला. जाधव याच्यासह विविध मालिकांमधील कलाकारांनी मिरवणुकीत हजेरी लावत रंग भरला. कोणी ढोल, तर कोणी ताशा वादन केले. त्यांची छबी मोबाइलमध्ये टिपण्यासाठी युवक-युवतींमध्ये एकच गर्दी झाली होती.
विसर्जनावेळी आपत्कालीन सुविधा
पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाकडील सर्व अग्निशमन केंद्रे 24 तास सतर्क ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांना मदत लागल्यास अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्र. 101 व 020 26451707 वर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.