रजनीकांत यांचा जावई ही धनुष याची ओळख कदाचित असू शकते. मात्र चांगला व्यक्ती आणि उत्तम कलाकार म्हणून त्याने आपली छाप सोडली आहे.
त्याच्या चांगल्या कामाची पावती त्याला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करून देण्यात आली आहे. हिंदीत तो आला मात्र फारसा रुळला नाही.
साऊथचे मोठे स्टार सहज म्हणून अथवा कोणाचा तरी आग्रह म्हणून हिंदीत काम करतात; पण त्यांचे मन येथे का रमत नाही हा संशोधनाचा विषय आहे. पण त्यामुळे प्रेक्षकांना चांगल्या कलाकारांच्या अदाकारीला मुकावे लागते.
अर्थात पूर्वी भाषेचा अडसर होता. आता तोही नसतो. त्यांचे तमिळ, तेलगू, कन्नड आदी भाषांतील चित्रपट त्याचवेळी हिंदीत डब करून रिलीज केले जातात, त्यामुळे प्रेक्षकांची सोय झाली आहे.
त्यामुळे प्रेक्षक ज्या सहजतेने शाहरुख, अक्षय, अजय, आमीर यांना ओळखतात त्याच सहजतेने अल्लू अर्जुन, रामचरण, पवन कल्याण, महेश बाबू, धनुष, यश यांनाही ओळखतात.
ही आजची नावे आहेत. त्यांचे असंख्य चाहते भारतभर आणि भारताबाहेरही आहेत. धनुषने बॉलीवूडमध्ये साक्षात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले. त्यांच्या उंचीमुळे कुठेतरी तो बुजल्यासारखा वाटला नाही व कुठे कमी पडला नाही. असो.
धनुषचा जगमे थंडीरम हा चित्रपट लवकरच येतो आहे. त्याचे ट्रेलर रिलीज करण्यात आले. तो मदुराई भागातील गॅंगस्टर दाखवण्यात आला आहे. परदेशी माफियांसोबत हा गॅंगस्टर काम करत असतो.
एकवेळ अशी येते की यांच्यासोबत काम करायचे की यांच्या विरोधात उभे राहायचे अशा द्वंद्वात तो सापडतो अशी स्टोरी लाइन आहे. धनुषचा आतापर्यंतचा सगळ्यात बेस्ट चित्रपट असेल आणि त्याचे सर्वोत्तम काम यात पाहायला मिळेल,
असा दावा या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने केला आहे. एक भडकपणा सोडला तर साऊथचे चित्रपट तंत्रज्ञानाने आणि अभिनयाने श्रीमंत असतात यात कोणता वादच नाही. धनुषचा हा चित्रपटही त्याच अपेक्षांवर खरा उतरणार अशी अपेक्षा.