गुवाहाटी – देशात करोनाची दुसरी लाट ओसरली जात आहे. मात्र अनेक ठिकाणी रुग्णांचे हाल होताना दिसून येत आहेत. करोना काळात अनेक समस्यांचा लोकांना सामना करावा लागत आहे. या जिवघेण्या आजारासोबतच माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना पाहायला मिळाल्या आहेत. कुणी आपल्याच पित्याचा अंत्यसंस्कार करण्यासाठी नकार देत आहे तर कुणी करोना झाला म्हणून घराबोहर काढत आहे. असे असताना मात्र एका सुनेनं आपल्या करोनाबाधीत सासऱ्याला स्वतःच्या खांद्यावर उचलून रुग्णालयत घेऊन गेल्याची कौतुकास्पद घटना पहावयास मिळाली आहे. दरम्यान या सुनेचा फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.
आसाममधील ही महिला असून तिने केलेल्या या धाडसाचे सगळीकडेच कौतुक होताना दिसून येत आहे. निहारीका असे या सुनेचे नाव आहे. भाटीगावच्या राहा येथील रहिवासी आहेत. निहारीका हिच्या ७५ वर्षाय सासऱ्यास करोना विषाणुची लागण झाली होती. तिचा पती कामानिमित्त घरापासून दूर राहातो. त्यामुळे निहारीकाने सासऱ्यांना खांद्यावर उचलून उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान या सुनेला देखील कोरोनाची लागण झाली आहे.