पुणे – डी. जे. चा दणदणाट, लेझर शो आणि धांगडधिंगा अशी पुण्याच्या गणेशोत्सवाची प्रतिमा होत आहे. ती बदलणे काळाजी गरज आहे. त्याचे प्रथम पाऊल कोथरूड परिसरातील सुतारदरा येथील शिवकल्याण मित्र मंडळाने टाकत “संकष्टी चतुर्थीला’ सर्व कार्यकर्त्यांनी शपथ घेत “यापुढे मंडळात डी.जे. वाजणार नाही,’ असा निश्चय केला आहे.
यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत काही बोटावर मोजण्याइतकीच मंडळे सोडली, तर अन्य सर्व मंडळाने डी.जे.च्या भिंती रचत मिरवणुकीत दणदणाट केला. त्याच्या जोडीला लेझर लाइट यामुळे अनेकांना हृदय, डोळे, त्वचा यासह अन्य व्याधींचा त्रास होऊ लागला. कर्वे रस्त्यासह टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता, शास्त्री रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, जंगली महाराज रस्ता यांसह उपनगरातील भागात डी.जे.चे प्रमाण अधिक होते.
या पार्श्वभूमीवर जिजाऊनगर येथील शिवकल्याण मित्र मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी निर्णय घेतला. सोमवारी (दि.3) संकष्टी चतुर्थीला शपथ घेत मंडळाच्या श्रींच्या विसर्जन मिरवणुकीत डी.जे. लावणार नाही. आपली संस्कृती टिकावी आणि पुढच्या पिढीला आपली खरी संस्कृती कळावी हाच आमचा उद्देश आहे, असे मंडळाचे संस्थापक सचिन मार्कंडे यांनी सांगितले.
मिरवणूक पारंपरिक पद्धतीनेच होईल. गणेशोत्सवात तरुणांसाठी नोकरी महोत्सव, आरोग्य शिबीर, विद्यार्थी दत्तक योजना, गावांचा विकास, परिसर आणि मंडळातील गरीब व गरजूंना मदत, समाजोपयोगी कार्यक्रम राबवणार आहोत. – सचिन मार्कंडे, संस्थापक, शिवकल्याण मित्र मंडळ