सातारा – किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन शासनातर्फे साजरा केला जाणार असून त्याची जय्यत तयारी सातारा प्रशासनाने केली आहे. शिवप्रताप दिन मागील 364 वर्ष हा दिन प्रतापगडावर साजरा केला जातो. मंगळवार, दि. 19 रोजी दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्त संपूर्ण किल्ल्यावर विद्युत रोषणाई केली असून लेझर शोचही आयोजन करण्यात आले आहे.
शिवप्रताप दिननिमित्ताने किल्ल्याची रंगरंगोटी, स्वच्छता करण्यात आली असून भगव्या पताका लावल्या आहेत. गडावरील प्रमुख टेहाळणी बुरजावर 75 फुटी उंचीचा भगवा ध्वज फडकवण्यात आलेला आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पृष्टी केली जाणार असून जिल्हा पोलिसांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली जाणार आहे. त्यानंतर ऐतिहासिक मर्दानी खेळ, ढोल पथक, लेझीम पथकाचे पोवाडे असा बहारदार कार्यक्रम होणार आहे.
शिवप्रताप दिनानिमित्त प्रतापगड पुन्हा गजबजणार आहे. प्रतापगडावर भवानी देवीची पूजा आरती अभिषेक केला जातो. ध्वजारोहण करून नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास जलाभिषेक करुन पुष्पहार अर्पण केला जातो. याशिवाय महाराजांच्या पालखीच्या मिरवणुकीचेही आयोजन गडावर केले आहे. यानिमित्त प्रतापगडावर पूर्ण राज्यातून शिवभक्त येण्यास सुरुवात झाली आहे.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी पोलीस अधीक्षक समीर शेख मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कुमार जाधव वाईचे पोलीस उपविभागीय अधिकारी बाळकृष्ण भालचिम तहसीलदार तेजस्विनी पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रतापगडावरील स्थानिक ग्रामस्थ व लगतच्या गावचे ग्रामस्थ शालेय विद्यार्थी यांनी तयारी पूर्ण केली आहे. शिवप्रताप दिनानिमित्त सातारा जिल्हा प्रशासनाने स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे.
दरवर्षीप्रमाणे शिवप्रतापगड उत्सव समितीच्या वतीने प्रमाणे वाई येथे 364 वा शिवप्रताप दिन मंगळवार (दि 19) रोजी सायंकाळी गणपती घाटावर संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास श्री श्री पिठाधीश्वर स्वामी जितेंद्र सरस्वती महाराज, हिंदू आश्रम नाशिक, यांच्या उपस्थितीत वीर जीवा महाले पुरस्कार बाळकृष्ण उर्फ आप्पा परब, मुंबई, पंताजी काका बोकील अभिवक्ता पुरस्कार राजीव देशपांडे पुणे यांना देण्यात येणार आहे. यावेळी शाहीर यशवंत जाधव संभाजीनगर यांचा प्रतापगडचा रणसंग्राम हा पोवाडयाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी किल्ला स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.