प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 27 –गणेशोत्सव महिनाभरावर आला असून, पोलिसांनी त्या नियोजनाला सुरूवात केली आहे. दरम्यान, करोनाच्या दोन वर्षांच्या मरगळीनंतर मंडळांनीही आता दणक्यात उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची तयारीही सुरू केली आहे. त्यासाठीच पोलिसांनी मंडळांच्या प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर पोलीस आयुक्तालयात बुधवारी बैठक घेतली.
सन 2019 च्या मंडप परवानगीनुसार मंडपात काही बदल नसल्यास ती मंडप परवानगी पाच वर्षांसाठी करावी. पादचारी मार्गचे नियोजन करून पुण्याच्या पूर्व भागात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करुन देण्यात यावा. गणेशोत्सवात 12 वाजेपर्यंत शेवटचे पाच दिवस ध्वनिक्षेपकाची परवानगी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करावी. जाहिरात कमानीबाबत लवचिक धोरण ठेवावे, शक्य असेल त्या रस्त्यावर फेरिवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी परवानगी द्यावी.
या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. गणपती मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तांकडे केल्या. त्यावर सकारात्मक विचार करुन स्थानिक पोलीस स्टेशनच्या पातळीवर चर्चा करुन निर्णय घेऊ, असे आश्वासन आयुक्तांनी कार्यकर्त्यांना दिले.
या बैठकीला पोलीस आयुक्त अभिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, रामनाथ पोकळे, जालिंदर कामठे, नामदेव चव्हाण आणि सर्व झोनचे उपायुक्त तसेच सुनील रासने, महेश सूर्यवंशी, प्रसाद कुलकर्णी, प्रवीण परदेशी, विकास पवार नितीन पंडित, पुनीत बालन, धीरज घाटे, भाऊ करपे, प्रमोद कोंढरे, सुनील पांडे, आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी गणेशोत्सव 2022 आचारसंहितेच्या माहिती दिली. त्यावर कार्यकर्त्यांनी काही सूचना आणि मागण्या पोलिसांकडे केल्या.