पुणे, दि. 27 – शहरात पावसाळयात पडलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने आतापर्यंत जवळपास अडीच कोटींचा खर्च केला असून, तब्बल 7 हजार खड्डे दुरुस्त करण्यात आले आहेत. तर दुसऱ्या बाजूला रस्त्यांचे काम करणाऱ्या ठेकेदारांकडूनही तीन हजार खड्डे दुरुस्त करून घेण्यात आले असून, त्यावर आतापर्यंत दीड कोटींचा खर्च ठेकेदारांनी केला आहे.
शहरात पावसाने उघडीप घेताच महापालिकेकडून खराब झालेल्या रस्त्यांची कामे सुरू केली आहेत. आतापर्यंत शहरात 11 हजार खड्डे सापडले असून, जवळपास 10 हजार खड्ड्यांची दुरुस्ती झालेली आहे. हे दुरुस्तीचे काम महापालिका आणि ठेकेदारांकडून एकाच वेळी शहरभर करण्यात येत आहे.
त्याचवेळी क्षेत्रीय कार्यालय स्तरावरही खड्डे दुरुस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे खड्डे दुरुस्तीच्या कामाला वेग आलेला असून, त्याच वेगाने महापालिकेसही दुरुस्तीसाठी पैसे मोजावे लागत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, पावसाने सलग विश्रांती घेतल्याने शहरासह, उपनगरे आणि समाविष्ट गावांमधील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी प्रशासनास दिल्या आहेत.