सर्व प्रमुख मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना
भाविकांनी बाप्पांचे दर्शन ऑनलाइन घेण्याचे आवाहन
पुणे – शहरातील सर्व प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी हातात हात घालून उत्सव साजरा करण्याचा नवा पायंडा पाडला आहे. पुणेकरांच्या दृष्टीने ही भूषणास्पद असणारी गोष्ट प्रत्यक्षात उतरली आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टने यासाठी पुढाकार घेतला होता. त्याला तितकीच मन:पूर्वक साद अन्य मंडळांनी दिली.
दरवर्षी गणरायाच्या प्रतिष्ठापना मान्यवर आणि दिग्गजांच्या हस्ते होते. मात्र, यंदा करोनामुळे मंडळांचे पदाधिकारी एकमेकांच्या मंडळांच्या गणपतीची प्रतिष्ठापना करतील, हे इतिहासात पहिल्यांदाच घडत आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे आणि सॅनिटायझरची व्यवस्था करण्याचे आवाहन आम्ही प्रत्येक मंडळांना करत आहोत. याशिवाय गणेशोत्सवाच्या कालावधीत भाविकांनीदेखील मांडवात येऊन दर्शन न घेता ऑनलाइन दर्शन घ्यावे, असे आवाहन असेल.
– पुनीत बालन, उत्सवप्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट.
गणरायाचे दर्शन घेताना भाविकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. ऑनलाइन दर्शनाला प्राधान्य द्यावे. शहरातील सर्व मंडळांनी याप्रकारचे निर्णय घेत, यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा.
– संजीव जावळे, अध्यक्ष, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट.
पुण्यातील गणेशोत्सव हा केंद्रबिंदू असतो. यंदा शहरातील सर्व मानाची आणि प्रमुख मंडळे एकत्र येऊन प्रतिष्ठापना करत आहेत. ही बाब एकता, एकोप्याचा संदेश देणारी आहे.
– संजय मते, अखिल मंडई मंडळ
शासकीय नियमांनुसार यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा होणार आहे. यंदा मानाची पाच आणि शहरातील प्रमुख तीन गणपती मंडळांनी एकत्र येत प्रतिष्ठापनेचा घेतलेला निर्णय स्तुत्य आहे.
– प्रवीण परदेशी, गुरूजी तालीम गणपती मंडळ
शहरातील आठ मंडळांनी घेतलेला निर्णय शहरातील बाकीच्या मंडळांनी देखील घ्यावा. यानिमित्ताने गणेश मंडळांमधील स्नेहदेखील आणखी वृद्धींगत होईल. यावर्षी आरोग्य शिबिरे मंडळांनी घ्यावी.
– राजाभाऊ टिकार, अध्यक्ष, तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळ
यंदाच्या करोनाच्या पार्श्वभूमीवर आठ मानाच्या गणपती मंडळांनी घेतलेला निर्णय प्रेरणादायी आहे. भक्तांनी देखील सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेत आणि ऑनलाइन दर्शन घ्यावे.
– अनिल सकपाळ, पदाधिकारी, केसरीवाडा गणपती मंडळ
मंडळांनी एकमताने आणि एकदिलाने घेतलेला निर्णय ऐतिहासिक आहे. याची दखल पुढील काळातदेखील नक्कीच घेण्यात येणार आहे. आचारसंहितेचे तंतोतंत पालन करण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहोत.
– विवेक खटावकर, अध्यक्ष, तुळशीबाग गणपती मंडळ
यंदा करोनाचे सावट पाहता उत्सव साधेपणाने साजरा करीत असतानाच मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांनी एकत्र येत हा निर्णय घेतला आहे. आठ गणेश मंडळांचे पदाधिकारी एकमेकांच्या मंडळांच्या गणेशाचे पूजन, आरती आणि प्रतिष्ठापना करणार आहेत.
– महेश सूर्यवंशी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट
मागील अनेक वर्षांपासून मंडळांशी एकरूप झालेले पदाधिकारी प्रतिष्ठापना करणार आहेत. भाविकांनीदेखील ऑनलाइन दर्शन घ्यावे आणि बाप्पांचा आशीर्वाद घ्यावा. करोनाच्या साथीच्या काळात देखील पुणेकर अत्यंत शिस्तप्रिय उत्सव साजरा करू शकतात, हे आपण जगाला दाखवू शकतो.
– श्रीकांत शेटे, अध्यक्ष, कसबा गणपती मंडळ