गजानन मारणेचे सोशल मीडियावर लाईक व स्टेटस ठेवणारे अडचणीत; गुन्हा दाखल

पुणे – गुंड गजा उर्फ गजानन मारणे आणि समर्थकांवर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. सोशल मीडियावर गुन्हेगारीचे उदात्तीकरण करुन दहशत पसरवली म्हणून गुन्हा दाखल केला गेला आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला असून, यामध्ये गजानन मारणासह त्याची आयटी टीम, समर्थक, सोशल मिडियावर पोस्टला लाईक व कमेंट केलेल्या व्यक्ती, युट्युब, फेसबुक आणि इंन्स्टाग्रामचे प्रोफाईलधारकांना आरोपी करण्यात आले आहे. यामुळे गजा मारणेच्या समर्थकांचेही धाबे दणाणले आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या निर्देशानूसार हे गुन्हे दाखल झाले आहेत. 

गुंड गजा मारणे यास पौड पोलीस ठाण्याच्या मोकाच्या गुन्हयातून न्यायालयाने 15 फेब्रुवारी रोजी मुक्त केले होते. तळोजा मध्यवर्ती कारागृहातून सुटल्यावर त्याने समर्थकांसह भव्य रॅली काढली होती. यामध्ये कायद्याचे उल्लंघन करण्यात आले होते तसेच रॅलीचे व्हिडिओ व स्टेटस टाकत त्याच्या समर्थकांनी प्रसिध्दी दिली होती. गजा मारणेवर खुन, मारामारी, खंडणी आदी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून परस्परविरोधी टोळीच्या वर्चस्ववादातून अनेकांचे खून झाले आहेत.

गजा मारणे प्रमाणेच त्याच्या विरोधी टोळीचे प्रमुख बाहेर आहेत. त्यांच्यावर दहशत बसावी म्हणून त्याने समर्थकांकरवी नियोजनपुर्वक तळोजा कारागृह ते कोथरुड अशी भव्य रॅली काढत त्याचे व्हिडीओ सोशल मिडियावर शेअर केले. त्याच्यावर कमेंट व लाईक करुन सर्वसामान्यांवर दहशत पसरवली. 

मारणेविरुध्द दाखल सात गुन्हे अद्यापही न्यायालयात प्रलंबित आहेत. या प्रलंबीत गुन्हयातील साक्षीदार, अन्यायग्रस्त व तक्रारदार यांच्या मनात भिती तयार करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. याप्रकरणाचा तपास अंमली पदार्थ विरोध वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.