पुणे : आता थेट पुलावरच टाकला राडारोडा

अंधारात कृत्य : राजाराम पुलाचे पदपथ राडारोड्याने अडविले

पुणे – नदीपात्रात रातोरात राडारोडा आणून टाकण्याचे प्रकार सर्रास सुरू असतानाच; आता अनधिकृत बांधकामांचा राडारोडा थेट भर रस्त्यातच टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. कर्वेनगर आणि सिंहगड रस्ता परिसराला जोडणाऱ्या राजाराम पुलाच्या पदपथावरच राडारोडा टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या पुलावरील पदपथ राडारोड्याने अडले असून ऐन वर्दळीच्या वेळी नागरिकांना मुख्य रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे.

शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांचा राडारोडा मोठ्या प्रमाणात शहरातील टेकड्या तसेच नदीपात्रात रातोरात आणून टाकण्याचे प्रकार सुरू आहेत. यावरून अनेकदा न्यायालयाने महापालिकेची कानउघडणी केली असली, तरी राडारोडा टाकण्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. मात्र, आता थेट भर रस्त्यावरच राडारोडा टाकण्यास सुरूवात झाली आहे.

पुलाच्या पदपथावर गेल्या तीन रात्रींपासून राडारोडा टाकला जात आहे. हा राडारोडा बांधकामांचा असून त्यात बीट आणि डेब्रिजचा समावेश आहे. ज्या ठिकाणी हा राडारोडा टाकण्यात आला आहे. त्या ठिकाणी जवळच महापालिकेच्या रस्त्याचे काम सुरू असून काही दिवसांपूर्वीच एमएनजीएलकडून याच भागात गॅसवाहिनी टाकण्यासाठी खोदाई करण्यात आली होती. हे काम सुरू असतानाच आता अचानक रातोरात या पुलावर तीन ठिकाणी राडारोडा टाकल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भर वर्दळीच्या ठिकाणी राडारोडा टाकण्यांवर महापालिका काय कारवाही करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कायदेशीर कारवाई करावी
रातोरात टाकण्यात आलेल्या या राडयारोड्याप्रकरणी महापालिकेने तातडीनं कारवाई करावी, अशी मागणी मनसेचे संतोष वाघमारे आणि कोथरूड विभाग अध्यक्ष सुधीर धावडे यांनी केली आहे. या प्रकरणी महापालिकेने या पुलाच्या परिसरात असलेल्या सीसीटीव्हींची तपासणी करून तातडीने कारवाई करावी, अशी मागणी वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाकडे देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. दरम्यान, याबाबत पालिका प्रशासन कारवाई करणार का, यापुढे असे प्रकार थांबवण्यासाठी काय पाऊल उचलणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.