कलबुर्गी (कर्नाटक) – कॉंग्रेस मधील कथित जी 23 गटाचे नेते गुलामनबी आझाद यांनी काल पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेऊन पक्षातील असंतुष्ट गटाच्या बैठकीत झालेल्या चर्चेची त्यांनी माहिती दिली. ही एक विधायक घडामोड आहे, पक्ष एकसंध ठेवण्यासाठी हे एक चांगले लक्षण आहे, असे कॉंग्रेसचे राज्यसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे.
एएनआयशी बोलताना खरगे म्हणाले, गुलाम नबी आझाद हे अनेक वर्षांपासून पक्षात आहेत. त्यांना सर्व काही माहीत आहे. त्यामुळे त्यांनी दिल्लीत जी 23 शी संबंधीत नेत्यांशी चर्चा केली आणि त्यांनी सोनिया गांधी यांची काल भेट घेतली. गुलामनबींनी पक्ष एकसंध ठेवण्याबाबत सोनियांना काही सुचना केल्या.
हे चांगले झाले. पक्षाला बळकट करणे हे सर्वच कॉंग्रेसजनांचे कर्तव्य आहे, असे ते म्हणाले.खरगे म्हणाले की मणिपूर, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गोवा आणि पंजाब या पाच राज्यांतील निवडणुकीतील पराभवासाठी केवळ गांधी कुटुंबालाच जबाबदार धरले जाऊ शकत नाही. आम्ही सर्वांनीच ही जबाबदारी घेतली पाहिजे.