निगडी – स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे एनडीएच्या (राष्ट्रीय सरंक्षण प्रबोधिनी) या वर्षीच्या पूर्व परीक्षांच्या तयारीसाठी ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाणार आहे. 20 जून ते 30 जुलै या कालावधीत हे ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग घेतले जाणार आहेत.
एनडीएमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन आणि निवृत्त ब्रिगेडियर बलजितसिंग गिल हे मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, हे प्रशिक्षण ऑनलाइन असल्यामुळे देशातील कुठल्याही भागातील विद्यार्थी याचा लाभ घेऊ शकतात. एनडीएच्या नियमानुसार या प्रशिक्षण वर्गासाठी 16 ते 19 वयोगटातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.
दहावीची परीक्षा दिलेले तसेच अकरावी आणि बारावीचे विद्यार्थी या प्रशिक्षण वर्गासाठी पात्र असतील. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी भास्कर रिकामे (9028546415) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.