नगर, (प्रतिनिधी) – मंत्रालयात नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची २८ लाखांची फसवणूक करणार्या पुणे येथील आरोपीला नगरमध्ये सोमवारी (दि. ८) रोजी अटक करण्यात आली. आरोपीला अटक करून पुणे येथील विमाननगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. विमाननगर पोलीस व कोतवाली पोलिसांच्या पथकाने संयुक्त कारवाई केली.
सिद्धार्थ देवीदास झेंडे (रा. म्हसोबावाडी, इंदापूर जि.पुणे), असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने महसूल विभागात आपली ओळख आहे, तुला मंत्रालयात लिपिक पदाची नोकरी देतो, असे सांगून एका तरुणाकडून वेळोवेळी २८ लाख ७८ हजार रुपये घेतले. परंतु नोकरी दिली नाही. याबाबत पुणे येथील विमाननगर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यातील आरोपी झेंडे हा नगर येथील माळीवाडा परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार विमानगर पोलिसांचे पथक नगरमध्ये दाखल झाले. या पथकाने कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्याशी संपर्क साधत संयुक्तरित्या ही कारवाई केली.