खासगी एजन्सीने 400 जणांकडून प्रत्येकी 200 रुपये घेतले
सात महिने उलटूनही अद्याप गुन्हा दाखल नाही
कापूरहोळ – आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य विमा योजनेचा लाभ व्हावा, यासाठी पात्र लाभार्थींचे अर्ज भरून गोल्डन ई-कार्ड काढण्यासाठी विशेष मोहीम चालू असताना नोंदणी करणाऱ्या एजन्सीने काही नागरिकांचे नाव लाभार्थी यादीमध्ये नसतानादेखील त्यांचे व कुटुंबीयांचे अर्ज भरून प्रत्येकी 200 रुपये घेऊन सुमारे 400 ग्रामस्थांची फसवणूक केली आहे.
डिसेंबर 2022 मध्ये घडलेल्या या घटनेनंतर सात महिने झाले तरी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. पोलीसही याबाबत तक्रार घ्यायला टाळाटाळ करत असल्याचा आरोप ग्रामपंचायतीने केला आहे.
या योजनेअंतर्गत सामाजिक आर्थिक जातीनिहाय 2011 च्या जनगणनेतील देशातील गरीब कुटुंबांतील लाभार्थीला उपचारासाठी 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळतो. प्रत्येक गावाची गरीब कुटुंबांची यादी तयार असून, त्या यादीमधील नागरिकांचे योजनेचे कार्ड काढण्याचे काम डिसेंबर 2022 मध्ये चालू होते. भारत जनआरोग्य योजनेंतर्गत आरोग्य विमा योजनेचा लाभ देण्याच्या नावाखाली तालुक्यातील नागरिकांचे नाव लाभार्थी यादीत नसतानाही त्यांचे अर्ज भरून झफायर एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना गोल्डन ई कार्ड देऊन नागरिकांची फसवणूक केली आहे.
या एजन्सीने नागरिकांची फसवणूक केल्याचे नागरिकांच्या लक्षात आल्यावर नसरापूर ग्रामंचायतीला तक्रार केली होती. त्यावर ग्रामपंचायतीने राजगड पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल करण्याचे निवेदन दिले होते. मात्र, याबाबत पुराव्याची मागणी करत तक्रार दाखल करण्यात आली नाही.
फसवणूक बाबत ग्रामसभेत ठराव झाला असून, जिल्हा पोलिस अधीक्षकांना सर्व पुराव्यानिशी निवेदन देणार आहे.
– विजय कुलकर्णी, ग्रामसेवक
लाभार्थीं यादीत नाव नसणाऱ्यांचे कार्ड काढून फसवणूक झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत असून पुढील तपासासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहे.
– डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे, वैद्यकीय अधिकारी, भोर तालुका