नगर -“सैराट’ फेम अभिनेता आकाश ठोसर याच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते उघडून नगर शहरातील महिलेची फसवणूक करणाऱ्या पुण्याच्या भामट्याला नगर सायबर सेलने आज अटक केली.
आरोपी शिवदर्शन नेताजी चव्हाण ऊर्फ शिवतेज (रा. पिंपरी चिंचवड, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याने महिलेकडून घेतलेले मंगळसूत्र आणि सोन्याची अंगठी पोलिसांनी जप्त केली आहे. एमआयडीसी येथे राहात असलेल्या महिलेने नगर सायबर सेलकडे 22 मे रोजी तक्रार केली होती.
या महिलेचा चार महिन्यांपूर्वी फेसबुकवर “सैराट’ फेम अभिनेता आकाश ठोसर याच्या बनावट खात्याशी संपर्क आला. पिंपरी चिंचवड येथील शिवदर्शन चव्हाण हा हे खाते हाताळत होता. याच खात्यावरून त्याने नगरमधील महिलेशी मैत्री वाढवून, अभिनेता आकाश ठोसर म्हणूनच फोनवर संभाषण सुरू ठेवले. त्यातून पुढे त्याने आर्थिक अडचणीत असल्याचे सांगून पैशाची गरज व्यक्त केली. या महिलेने एवढा मोठा अभिनेता पैसे मागतो आहे, म्हणून लगेचच पैसे देण्याची तयारी दर्शवली. हे पैसे घेण्यासाठी नगरला येतो, असे त्याने महिलेला सांगितले. पण आकाश ठोसर म्हणून बोलत असलेल्या शिवदर्शन याने ऐन वेळेस महिलेला संपर्क साधून मला यायला जमणार नाही. मित्राला पाठवितो, असे सांगितले.
त्यानुसार आकाश ठोसर म्हणून संभाषण करणारा शिवदर्शन स्वतः नगरमध्ये आला आणि या महिलेकडून दागिने घेवून गेला. दागिने मिळाल्यानंतर शिवदर्शनने आकाश ठोसरच्या नावाने हाताळत असलेले आणि त्याने तयार केलेले फेसबुकवरील बनावट खाते बंद केले. त्यावरून महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तिने नगर सायबर सेलकडे तक्रार केली होती. त्यानुसार सायबर पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले. ही कारवाई सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण परदेशी, प्रतीक कोळी, योगेश गोसावी, उमेश खेडकर, मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, राहुल हुसळे, अरुण सांगळे, भगवान कोंडारे, अमोल गायकवाड, वासुदेव शेलार यांच्या पथकाने केली.