सातारा -जिल्हा परिषद शाळांचा उंचावणारा शैक्षणिक दर्जा, इंग्रजी माध्यमांच्या शाळांची भरमसाट फी आदी कारणांमुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली आहे. 2020- 21 मध्ये 723 विद्यार्थी मराठी माध्यमात आले होते. यामध्ये 2021- 22 मध्ये दुप्पट वाढ झाली असून ती संख्या एक हजार 387 वर गेली आहे. जिल्हा परिषद शाळांकडे विद्यार्थी- पालकांचा कल दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांची संख्या 2 हजार 690 आहे. बदलत्या युगात शिक्षण क्षेत्रातही डीजिटायझेनवर भर देण्यात आला आहे. जिल्ह्यात डीजिटल क्लासरुमची संकल्पना वाढीस जात आहे.
आदर्श शाळा उपक्रमही प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण विभागाकडून अनेक बदल स्वीकारण्यात आले. जिल्हा परिषदेच्या शाळा टिकल्या पाहिजेत या हेतूने विद्यार्थी घडवण्याचे काम जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमधून होत आहे. इंग्रजी माध्यमांचे आव्हान असतानाही जिल्हा परिषद शाळा तेवढ्याचा ताकदीने उभ्या राहत आहेत. शिष्यवृत्ती पॅटर्नच्या माध्यमातून जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण करण्यात यश आले असून विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याने मराठी माध्यम नको म्हणणारे पालक आज पुन्हा जिल्हा परिषद शाळांकडे आकषित होऊ लागले आहेत. करोना संकटाच्या काळात इंग्रजी माध्यमांचे अनेक विद्यार्थी पुन्हा जिल्हा परिषद शाळांकडे येऊ लागले आहेत. 2020-21 या वर्षात इंग्रजी माध्यमांमधील 723 विद्यार्थी मराठी माध्यमात आले होते.
खंडाळा तालुक्यातील 211 सर्वाधिक विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. 2021-22 या वर्षात इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून एक हजार 387 विद्यार्थी मराठी माध्यमांच्या शाळांकडे आले. जिल्हा परिषद शाळांकडे सुमारे दुप्पट विद्यार्थ्यांचा कल दिसून आला. कराड तालुक्यातील 298, खंडाळा तालुक्यातील 216, सातारा तालुक्यातील 189, फलटण व खटाव तालुक्यातील प्रत्येकी 153 विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे.
करोनाच्या संकटात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ऑनलाइन, ऑफलाइन शिक्षण देण्यात आले. या काळात विद्यार्थी- पालकांशी समन्वय ठेवून शिक्षकांनी त्यांना आधार देण्याबरोबरच शिक्षणाचा दर्जा कमी होऊ नये यासाठी प्रयत्न केले. प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हा परिषद शाळांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून मराठी माध्यमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याचे समाधान आहे.
– शबनम मुजावर (शिक्षणाधिकारी, प्राथमिक)