पुणे- देशातील आयआयटी, एनआयटी व प्रतिष्ठित अभियांत्रिकी शिक्षणसंस्थांतील प्रवेशासाठी अनिवार्य असलेली जेईई मेन परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी 5 एप्रिलपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) देशभरात जेईई मेन परीक्षेचे आयोजन केले जाते. या प्रवेशासाठी नोंदणी करण्यासाठी “एनटीए’ मुदत वाढविली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज केला नसेल ते अर्ज करू शकतील. मुदत वाढवून दिल्याने आता विद्यार्थ्यानी वेळेत परीक्षेचा अर्ज करावा. यानंतर विद्यार्थ्यांना अर्जासाठी दुसरी संधी दिली जाणार नाही.
जेईई मेन परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत अर्ज करता आले नाही. या पार्श्वभूमीवर अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांतून होत आहे.