पिंपरी – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणतर्फे (पीएमआरडीए) मध्ये होणारी अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी तसेच अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी आता पीएमआरडीएच्या वतीने चार पथकांची निर्मिती करण्यात आली असून ही चार पथके पुढील काळात पीएमआरडीएमध्ये होणारी अनाधिकृत बांधकामे रोखणार आहेत. पीएमआरडीएतर्फे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येत आहे.
यात व्यावसायिक, औद्योगिक तसेच रहिवास असलेल्या अनधिकृत बांधकामांचा समावेश आहे. यातील काही बांधकामांमध्ये काही कुटुंब वास्तव्य करीत होते. अशा बांधकामांवरही कारवाई करण्यात आली. अशी बांधकामे करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यानुसार 1 जानेवारी 2018 पासून आतापर्यंत पोलिसांकडे 49 तक्रारी करण्यात आल्या असून, त्यानुसार 154 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच 17 जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
5 लाख 26 हजार 943 चौरस फुट अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. अनधिकृत बांधकामाच्या कारवाई दरम्यान अडथळा निर्माण करणाजया व्यक्तिंविरोधात ही कारवाई झाली. पोलिसांनी अशा 17 जणांना त्याबाबत नोटीस बजावल्या होत्या. अनधिकृत बांधकामे होऊ नयेत म्हणून त्याबाबत पाहणी करण्यासाठी चार अभियंत्यांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. तसेच आचारसंहितेदरम्यानही अनधिकृत बांधकामांवरील कारवाई सुरूच राहणार आहे.
प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना
राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. असे असले तरी पीएमआरडीएच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येणार आहे. प्रशासनाकडून त्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. कारवाई दरम्यान पोलीस बंदोबस्त उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच नवीन अनधिकृत बांधकामे होणार नाहीत, याचीही प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येणार आहे.
अनधिकृतच्या माहितीसाठी “जिप’कडे साकडे
अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना त्याबाबत पत्र देण्यात आले आहे. गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात अनधिकृत बांधकामे थांबविण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच अशी बांधकामे होत असल्याचे दिसून आल्यास पीएमआरडीए आणि संबंधित अधिकाऱ्यांना माहिती द्यावी, अशा सूचना या पत्रातून करण्यात आल्या आहेत.