पंचरंगी लढत पाहायला मिळणार
प्रमुख पक्षांमध्ये बंडखोरी झाल्याने मतांची विभागणी होण्याची शक्यता
सद्यस्थितीला पुण्यात भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदार संघात पंचरंगी लढत पाहायला मिळेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. या मतदार संघासाठी सगळ्याच पक्षातून इच्छुकांची संख्या मोठी होती. त्यातून प्रमुख पक्षांमध्ये बंडखोरी झाल्याने मतांची विभागणी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जातीपातीच्या राजकारणाचा विचार केला तर, ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मण असा उमेदवार न देता ब्राह्मण विरुद्ध मराठा अशी लढत या मतदार संघात होईल की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.
कसबा विधानसभा मतदार संघात या आधीही ब्राह्मण विरुद्ध मराठा असा राजकीय संघर्ष झाला होताच. या जाती पातीच्या राजकारणात या आधी अरविंद लेले यांच्या विरोधात उल्हास काळोखे यांनी लढत दिली होती आणि काळोखे जिंकून आले होते. तोच प्रकार नंतर बापट विरुद्ध वसंत (तात्या) थोरात यांच्यात झाला. आण्णा जोशी लोकसभेवर निवडून गेल्यानंतर विधानसभेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत बापट विरुद्ध थोरात लढत झाली आणि त्यात थोरात यांचा विजय झाला होता.
भाजपने विद्यमान महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी दिली आहे तर, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतून हा मतदार संघ कॉंग्रेसला देण्यात आला आहे. कॉंग्रेसकडून अधिकृतपणे महापालिकेतील कॉंग्रेसचे विरोधीपक्षनेते अरविंद शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कॉंग्रेसमधील दुसरे इच्छुक रवींद्र धंगेकर यांनी बंडखोरी करत “कसबा विकास आघाडी’ स्थापन करून अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजप-सेना युती असल्याचे जाहीर जरी केले नसले तरी ती अप्रत्यक्षरित्या असल्याचे दिसून येत आहे. मात्र, कसब्यात शिवसेनेचे नगरसेवक असलेल्या विशाल धनवडे यांनी गेल्या काही दिवसांपासून विधानसभेची तयारी चालवली होती. मात्र, पक्षाने त्यांना तिकिट न दिल्याने त्यांनी अपक्ष लढवण्याचा निर्णय घेत अर्जही दाखल केला आहे.
याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आपली ताकद दाखवण्यासाठी पक्षाचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे याठिकाणी टिळक, धंगेकर, शिंदे, धनवडे आणि अजय शिंदे अशी प्रमुख पंचरंगी निवडणूक पाहायला मिळणार आहे. अर्थात 7 तारीख ही अर्ज मागे घेण्याची अंतीम मुदत असल्याने त्यादिवशी येथील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
गेल्या 24 वर्षांपासून गिरीश बापट यांनी या मतदार संघावर वर्चस्व प्रस्थापित केले होते. या मतदार संघातून ते पाचवेळा निवडून आले. हा मतदार संघ पेठांचा असला तरी मतदार संघाच्या पुनर्रचनेत याला भवानी पेठ, लोहियानगर वगैरे कॉस्मोपॉलिटन भाग जोडला गेला आहे. हा भाग कॉंग्रेसला मानणारा असला तरी बापट यांनी अन्य पक्षीय कार्यकर्त्यांशी असलेल्या त्यांच्या वैयक्तिक संबंधांमधून तो बांधून ठेवला होता. त्याचा फायदा आणि महापौर म्हणून केलेल्या कामाचा फायदा मुक्ता टिळक यांना होईल.
2014 मध्ये बापट यांना धंगेकर यांनी मनसेच्या झेंड्याखाली कडवी लढत दिली होती. त्यावेळी ते दुसऱ्या स्थानावर राहिले होते. याशिवाय महापालिका निवडणुकीतही त्यांनी भाजपच्या नगरसेवकाला पाडून नगरसेवकपद काबीज केले होते. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला असून, यंदाही त्यांनी याठिकाणी शक्ती प्रदर्शन करत जिंकून येणारच असा चंग बांधला आहे.
मुक्ता टिळक यांनीही कसबा विधानसभा मतदार संघात येणाऱ्या एका प्रभागातून चारवेळा निवडणूक लढवून विजय मिळवला आहे. बहुतांश पेठांच्या भागामध्ये त्यांचा चांगला संवाद आहे. तसेच, लोकमान्य टिळक घराण्याचा त्यांना वारसाही आहे. त्यामुळे पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे.
कसबा, कोथरूड, पर्वती, हडपसर, शिवाजीनगर, कॅन्टोन्मेंट, वडगावशेरी, खडकवासला या 8 विधानसभा मतदार संघात एका दिवसांत सुमारे 46 जणांनी अर्ज दाखल केले. 27 सप्टेंबरपासून ते 4 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करण्याला मुदत देण्यात आली आहे. 28 तारखेला अमावस्या आणि पितृपंधरवड्याची समाप्ती होती. त्यामुळे अर्ज दाखल करण्यात आले नाहीत. शिवाय 29 तारखेला रविवार असल्याने आणि 2 ऑक्टोबरला सार्वजनिक सुटी असल्याने अर्ज दाखल झाले नाहीत. मात्र, 1 ऑक्टोबर रोजी काहीजणांनी अर्ज दाखल केले आहेत. मुळात प्रमुख पक्षांच्या याद्या या दोन दिवसांत जाहीर झाल्या आहेत. अद्यापही काही ठिकाणची काही पक्षाची अंतिम यादी जाहीर झाली नाही. शुक्रवारीही (दि. 4) अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. काही उमेदवारांनी गुरुवारी डमी अर्ज दाखल केला असून, शुक्रवारी ते आणखी एकदा अर्ज दाखल करणार आहेत. शहरातील 8 विधानसभा मतदार संघातील कसबा मतदार संघात भाजपकडून महापौर मुक्ता टिळक, महापालिकेतील कॉंग्रेस गटनेते अरविंद शिंदे हे आघाडीतर्फे आणि शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला.
कोथरूड विधानसभा मतदार संघात महसूलमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी युतीचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. तसेच, मनसेकडून किशोर शिंदे यांनी डमी अर्ज दाखल केला आहे. ते शुक्रवारी आपला अर्ज दाखल करतील. खडकवासला मतदार संघात युतीचे उमेदवार म्हणून विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांनी अर्ज दाखल केला. याशिवाय शिवसेनेचे बंडखोर उमेदवार रमेश कोंडे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.
वडगावशेरी विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार जगदीश मुळीक यांनी भाजपतर्फे अर्ज दाखल केला. पर्वती विधानसभा मतदार संघात भाजपकडून विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांनी अर्ज दाखल केला. तर हडपसर विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांनी भाजपकडून आणि मनसेचे महापालिकेतील गटनेते वसंत मोरे यांनी अर्ज दाखल केले आहेत. शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात भाजपकडून नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे, कॉंग्रेसकडून दत्तात्रय बहिरट आणि आपकडून मुकुंद किर्दत यांनी अर्ज दाखल केले आहेत. कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात कॉंग्रेसकडून रमेश बागवे आणि युतीकडून नगरसेवक सुनील कांबळे यांनी अर्ज दाखल केला.