वाठारस्टेशन – वाघोली (ता. कोरेगाव) येथे जमिनीच्या वादातून जावयाने चुलत सासऱ्याला गोळ्या घातल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली होती. या घटनेनंतर स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झालेल्या दोघांसह आज आणखी दोघे अशा चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांनी सांगितले.
या घटनेतील रवी बळवंत यादव व त्याचा भाऊ संदीप बळवंत यादव (मूळ गाव सिद्धेश्वर किरोली, ता. खटाव, सध्या रा. निगडी प्राधिकरण पिंपरी चिंचवड, पुणे) हे आरोपी गोळीबार केल्यानंतर स्वतः वाठार पोलीस ठाण्यात हजर झाले होते. तर मंगळवारी छाया नामदेव भोईटे व उमेश भालेराव भोईटे (रा.वाघोली) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
जमिनीच्या मालकी हक्क व वहिवाटीच्या वादावरून वाघोली येथील सुनील शंकर भोईटे (वय 48) यांच्यावर मयत सुनील यांची भावजय छाया नामदेव भोईटे व उमेश भालेराव भोईटे यांच्या सांगण्यावरून छाया भोईटे यांचे जावई रवी व संदीप यांनी सुनील भोईटे यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या होत्या. त्यामध्ये सुनील भोईटे यांचा जागीच मृत्यू झाला होता. गोळीबार केल्यानंतर रवी व संदीप हे दोघे स्वतःहून वाठार पोलीस ठाण्यात हजर झाले होते. घटनेतील चार आरोपींना मंगळवारी कोरेगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक संजय बोंबले या गुन्ह्याचा तपास सहाय्यक करत आहेत.