सातारा – सातारा उप प्रादेशिक पारिवहन कार्यालयामार्फत विशेष रात्र बस तपासणी मोहीम राबविण्यात आली. विविध गुन्ह्याखाली मोटार वाहन कायद्यांतर्गत खासगी बसेसवर कारवाई करण्यात येऊन विनापरवाना व थकित कर असणारी वाहने, बसेसमधून मालवाहतूक करणारी वाहने व जादा भाडे आकारणी करणारी वाहने यावर विशेषत्वाने मोटार वाहन कायद्यांर्गत दोषी आढळून आलेल्या 181 खासगी बसेसवर कारवाई करुन 4 लाख 60 हजार 608 इतका दंड वसूल करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिली.
अपघात व अपघाती मृत्यू कमी करण्याच्या दृष्टीने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत दि. 1 ते 17 एप्रिल या कालावधीमध्ये रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग व इतर महामार्गावर तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेमध्ये 1913 दोषी वाहनांवर कारवाई करुन 20 लाख 30 हजार 242 इतकी प्रत्यक्ष दंड व कर वसुली करण्यात आली. अपघात रोखण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येत आहे. तालुकानिहाय नेमलेल्या विशेष पथक व दोन नियमित पथकांमार्फत ज्या ठिकाणी अपघाताची तीव्रता जास्त आहे अशा ठिकाणी विशेषत: हेल्मेट, सिटबेल्ट, अतिवेग, रॅश ड्रायव्हिंग आदी गुन्ह्यांसाठी वाहन तपासणी करुन दोषी वाहनांवर कारवाई करण्यात येत असल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले.
खंडाळा येथे नेमलेल्या स्थायी पथकामार्फत खासगी व इतर बसेस तसेच प्रवासी वाहने राष्ट्रीय महामार्गावर बेकायदेशीरपणे थांबा घेऊन प्रवाशी चढ उतार करतात. त्यामुळे इतर रस्ता वापर करणाऱ्या घटकांना धोका उत्पन्न होतो. त्यावर कारवाई करण्यात आली. आनेवाडी टोल नाका स्थायी पथकामार्फत रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट, सिटबेल्ट, अतिवेग, मोबाईल, रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यात होणाऱ्या अपघातस्थळी तातडीने भेट देण्यासाठी व अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी दोन फिरत्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या ठिकाणी पुन्हा अपघात होऊ नये यासाठी उपाययोजना राबवण्याबाबत संबंधित विभागांना अवगत करण्यात आले आहे. अंमलबजावणी दरम्यान वाहनचालकांकडून तशाच प्रकारची चूक टाळण्यासाठी आवश्यक ते समुपदेशन पथकातील अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
विनोद चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी