चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला; बंगालमध्ये सर्वांधिक 8 टप्प्यांत मतदान

नवी दिल्ली,  -देशाचे राजकारण ढवळून काढणाऱ्या विधानसभा निवडणुकांचा बिगुल शुक्रवारी वाजला. निवडणूक आयोगाने पश्‍चिम बंगाल, तामीळनाडू, केरळ, आसाम या चार राज्यांबरोबरच पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार, 27 मार्चपासून मतदानाची प्रक्रिया सुरू होईल. तर, पाचही विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी (2 मे) जाहीर होतील.
मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी येथे पत्रकार परिषदेत विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले.

पश्‍चिम बंगालमध्ये सर्वांधिक 8 टप्प्यांत मतदान होईल. पहिल्या टप्प्यासाठी 27 मार्चला, तर अखेरच्या टप्प्यासाठी 29 एप्रिलला मतदान होईल. मधल्या टप्प्यांसाठी 1, 6, 10, 17, 22 आणि 26 एप्रिलला मतदार त्यांचा हक्क बजावतील. त्या राज्यात मागील वेळी 7 टप्प्यांत निवडणूक घेण्यात आली होती. आसाममध्ये 27 मार्च, 1 आणि 6 एप्रिल अशा 3 टप्प्यांत मतदान घेतले जाईल. तर, केरळ, तामीळनाडू आणि पुद्दुचेरीत एकाच टप्प्यात (6 एप्रिल) मतदानाची प्रक्रिया पार पडेल.

करोना संकट, शेतकरी आंदोलन, इंधन दरवाढ आणि प्रादेशिक राजकीय स्थिती, समीकरणांच्या पार्श्‍वभूमीवर चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांच्या दृष्टीने त्या अतिशय प्रतिष्ठेच्या ठरणार आहेत. केंद्र सरकारचे नेतृत्व करणारा भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्या-त्या राज्यांमधील सत्ताधाऱ्यांच्या लोकप्रियतेचा कस त्या निवडणुकांमध्ये लागेल.

बंगालमध्ये विधानसभेच्या 294 जागा आहेत. त्या राज्यात दहा वर्षांपासून तृणमूल कॉंग्रेस सत्तेवर आहे. त्या पक्षापुढे भाजपने मोठे आव्हान उभे केले आहे. त्याशिवाय, कॉंग्रेस-डाव्या पक्षांच्या आघाडीमुळे बंगालमध्ये तिरंगी लढत अपेक्षित आहे. विधानसभेच्या एकूण 234 जागा असणाऱ्या तामीळनाडूत सत्तारूढ अण्णाद्रमुकची प्रमुख लढत द्रमुकशी असेल. अण्णाद्रमुकने भाजपशी युती केली आहे, तर द्रमुकची कॉंग्रेसशी हातमिळवणी झाली आहे. केरळमध्ये (140 जागा) डाव्या पक्षांची सत्ता आहे. त्यांचा मुकाबला प्रामुख्याने कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीशी आहे. विधानसभेच्या 126 जागा असणाऱ्या आसामची सत्ता राखण्यासाठी भाजपला कॉंग्रेसशी दोन हात करावे लागणार आहेत. काही आमदारांच्या राजीनाम्यामुळे कॉंग्रेसला ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुद्दुचेरीची सत्ता गमवावी लागली. त्या केंद्रशासित प्रदेशात विधानसभेच्या केवळ 30 जागा आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.