सातारा – मोटारसायकलीवरून फिरून मोबाइल हॅंडसेट जबरदस्तीने चोरल्याप्रकरणी करण ज्योतिराम चव्हाण (वय 19, रा. डबेवाडी, ता. सातारा), योगेश संजय कुऱ्हाडे (वय 19, रा. बोगदा परिसर, सातारा), सिद्धार्थ सतीश महाडिक (वय 20) व अनुज चंद्रकांत जाधव (वय 19, दोघे रा. आरे, ता. सातारा) यांना सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एक मोटारसायकल व पाच मोबाइल हॅंडसेट असा एक लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्याजवळ चारचाकी वाहनाचा टायर पंक्चर झाल्याने त्या गाडीचा चालक सुझुकी शोरूम ते बॉम्बे रेस्टॉरंट या दरम्यान गॅरेज शोधत, फोनवर बोलत जात होते. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या चौघांनी त्यांच्या हातातील मोबाइल हिसकावून नेला होता. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेतला. सातारा शहर परिसरातून पळून गेलेले हे चोरटे काल (दि. 18) पुन्हा साताऱ्यात आल्याचे समजल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांनी चौकशीमध्ये गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्यात वापरेलेली मोटारसायकल व पाच मोबाइल हॅंडसेट जप्त करण्यात आला आहेत. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, हवालदार नीलेश यादव, सुजीत भोसले, संतोष शेलार, नीलेश जाधव, पंकज मोहिते, विक्रम माने, विशाल धुमाळ, संतोष कचरे, गणेश घाडगे, सागर गायकवाड, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम यांनी ही कारवाई केली.