सातारा -स्वातंत्र्यदिनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह मजकूर समाज माध्यमांवर प्रसारित करणाऱ्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्यांना धमकीचे मेसेज आले आहेत. याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते शुक्रवारी रात्री उशिरा शहर पोलिस ठाण्यात जमले होते.
स्वातंत्र्यदिनी एका अल्पवयीन मुलाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह मजकूर असलेली पोस्ट प्रसारित झाली होती. तीच पोस्ट संबंधित युवकाच्या स्टेटसवरही होती. या प्रकाराच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको केला होता.
त्याचबरोबर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनाही संबंधितावर कडक कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन दिले होते. या प्रकारामुळे काल शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. दरम्यान, यासंदर्भात आज कोरेगावमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा निघाला होता.