नगर -मान्सूनपूर्वसह मान्सूनच्या पावसाने जिल्ह्यात जोरदार बॅटिंग केल्याने यंदा 17 तारखेलाच जून महिन्याची सरासरी ओलांडली असून, जिल्ह्याच्या सरासरीच्या 31.33 टक्के पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वच तालुक्यांत पावसाने हजेरी लावली आहे. बुधवारी नगर शहरासह जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली.
अकोलेत मुळा नदी वाहू लागली आहे. गेल्यावर्षी 17 जूनपर्यंत सहा टक्के पावसाची नोंद झाली होती. यंदा मात्र आतापर्यंत 31.33 टक्के पावसाची नोंद होवून गेल्यावर्षीपेक्षा तब्बल 25 टक्के पाऊस जास्त झाला आहे. त्याबरोबर जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या काळात सरासरी 515 मिलिमीटर पावसाची नोंद होत असते. यंदा जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच 161.41 मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे जून महिन्यातच सरासरीच्या 31 टक्के पाऊस पडला आहे. तसेच जून महिन्याची देखील सरासरी यंदा पावसाने ओलांडली आहे.
जिल्ह्यात पाथर्डी, श्रीगोंदा वगळला उर्वरित बहुतांश तालुक्यांत 25 टक्क्यांच्या पुढे पाऊस झाला आहे. पाऊस समाधानकारक झाल्याने आता शेतकरी खरिपाच्या पेरणीसाठी सज्ज झाले असून, आता त्यांना वाफशाची प्रतीक्षा आहे. आजही काही ठिकाणी शेतामध्ये पाणी असल्याने शेतकऱ्यांना वाफसा कधी होणार, याकडे लक्ष लागले आहे. तालुकानिहाय आतापर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी मिलिमीटरमध्ये: अकोले- 215, संगमनेर- 158, कोपरगाव- 214, श्रीरामपूर- 257, राहुरी- 287, नेवासे- 139, राहाता- 142, नगर- 135, शेवगाव- 140, पाथर्डी- 106, पारनेर- 160, कर्जत- 125, श्रीगोंदा- 68, जामखेड- 112. दरम्यान, बुधवारी नगर शहरात दुपारी अर्धा तास जोरदार पाऊस झाला. त्याबरोबर जिल्ह्यात बहुतांशी तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली.