दापोडी, (वार्ताहर) – युवकांना शारीरिक कसरती करण्यासाठी मैदानाचा अभावशहरीकरणामुळे गावाचे गावपण बदलले आहे. गावाची नगर बनली. उंच इमारती निर्माण झाल्या परंतु नागरिकांमधील माणुसकी, परंपरा आणि संस्कृती यांची उंची मात्र दिवसेंदिवस कमी होत आहे. पिंपरी चिंचवड शहरातील अनेक गावांमध्ये लोकसंख्येच्या तुलनेत युवक, तरुण, तरुणी आणि नागरिकांना खेळण्यासाठी मैदाने नाहीत.
बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक विकास झाला तर माणूस संकटांना सामोरे जातो. परंतु दापोडी येथे युवकांना, लहान मुलांना खेळण्यासाठी मैदान नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने दापोडीत सार्वजनिक खेळाचे एक तरी मैदान उभारावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दापोडीत मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग वास्तव्यास आहे. एकेकाळी इंग्रजांचे सैन्य तळ, शिवकालीन साधूसंतांचे विसाव्याचे ठिकाण असलेल्या दापोडीत खेळाचे मैदान शिल्लक नाही. खेळाडूंना सांगवी येथील पाटबंधारे विभागाच्या मैदानावर खेळ खेळण्यासाठी सरावासाठी जावे लागते. दापोडीत दोन उद्याने आहेत.
मात्र, सार्वजनिक खेळाचे मैदान नसल्याने महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर दापोडीकरांसाठी खेळाचे मैदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी क्रीडाप्रेमींमधून होत आहे. सध्या खासगी मोकळ्या जागेवर अतिक्रमणे व कचरा कुंड्यांच्या अवस्थेत काही मैदाने आहेत.
पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौक गावठाण परिसर, शितळादेवी परिसर, फिरंगाई देवी परिसर या भागांत खेळण्यासाठी मैदाने होती. सध्या दापोडीत मुलांना खेळण्यासाठी मैदान नसल्याने मैदानी खेळांपासून मुले दुरावली आहेत.
मुलांच्या मानसिकतेवर परिणाम
लहान मुले खेळण्यापेक्षा मोबाइल, टीव्ही, घरगुती खेळ यामध्ये वेळ घालवत आहेत. त्यांची शारीरिक हालचाल ज्या प्रमाणात होणे अपेक्षित आहे त्या प्रमाणात होत नसल्याने मुले स्थूल, चिडचिडे अथवा डोळ्यांच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यांचा सार्वांगीण विकास होण्यासाठी मैदानी खेळ महत्त्वाचे आहेत.
त्यातून त्यांची खिलाडू वृत्ती विकसित होते. जीवन जगताना ताणतणावमुक्त जीवन जगता येते. त्यामुळे दापोडी परिसरात महापालिका प्रशासनाने खेळाचे मैदान उभारणे गरजेचे आहे