जम्मू -स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सुरक्षा दलांनी घातपाताचा मोठा डाव उधळण्याची कामगिरी करताना चार दहशतवाद्यांना अटक केली. ते जैश-ए-महंमद या पाकिस्तानस्थित संघटनेचे सदस्य आहेत. सुरक्षा दलांच्या हाती आलेल्या दहशतवाद्यांपैकी एक उत्तरप्रदेशचा रहिवासी आहे.
वाहनांमध्ये आयईडी स्फोटके ठेऊन जम्मूत स्फोट घडवण्याचा कट जैशने रचला होता. त्याचा सुगावा लागल्यानंतर सुरक्षा दलांनी तातडीने हालचाली करत चौघांना अटक केली. ते जैशच्या पाकिस्तानमधील म्होरक्याच्या संपर्कात होते. उत्तरप्रदेशचा रहिवासी असणाऱ्या इजहार खान उर्फ सोनू खान याने चौकशीवेळी दिलेल्या माहितीमुळे जैशच्या व्यापक कटावर प्रकाश पडला.
ड्रोनमधून पंजाबच्या अमृतसरनजीक टाकली जाणारी शस्त्रास्त्रे ताब्यात घेण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती. जैशच्या म्होरक्याच्या आदेशावरून खान याने पानिपत ऑईल रिफायनरीची टेहळणी करून परिसराचे व्हिडिओ पाकिस्तानला पाठवले. अयोध्येतील रामजन्मभूमी परिसराची टेहळणी करण्यासही त्याला सांगण्यात आले. मात्र, ते करण्याआधीच त्याला पकडण्यात आले.
इतर दहशतवाद्यांच्या चौकशीतून आणखी माहिती मिळण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात सुरक्षा जवानांच्या गस्ती पथकाने पेरून ठेवलेली स्फोटके वेळीच शोधली. ती स्फोटके तातडीने निकामी करण्यात आली. त्यामुळे घातपाताचा आणखी एक डाव अयशस्वी ठरला.