चांदा -नेवासे तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात पाच शेळ्या ठार झाल्या. तसेच या बिबट्याने एका कुत्र्याचा फडशा पाडला. त्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण
झाले आहे.
महालक्ष्मी हिवरे येथील अशोक गणपत रणबावरे हे शेतातील वस्तीवर राहतात. बुधवारी (दि. 3) रात्री बिबट्याने त्यांच्या घराजवळील जाळीच्या आतील बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला केला. त्यामुळे शेळ्यांनी आरडाओरडा सुरू केला. शेळ्यांचा आवाज आल्याने रणबावरे हे घराबाहेर आले असता त्यांना समोर बिबट्या दिसला. त्यामुळे त्यांनी घरातील व्यक्तींना मदतीसाठी आवाज दिला.
त्यानंतर बिबट्या पळून गेला. यावेळी रणबावरे यांनी गोठ्यात जाऊन पाहणी केली असता त्यांना चार शेळ्या मृत आढळून आल्या. त्यानंतर बिबट्याने खरेदी-विक्री संघाचे संचालक राजेंद्र नानासाहेब गायके यांच्या वस्तीवर मोर्चा वळवला. या ठिकाणी बिबट्याने पाळीव कुत्र्याचा फडशा पाडला. तसेच म्हाळस पिंपळगाव येथील वस्तीवर राहणारे नवनाथ उद्धव कर्डिले यांच्या घराबाहेर बांधलेल्या शेळीवर हल्ला केला. तसेच तिला तीनशे ते चारशे फुटांच्या अंतरावर उसात ओढून नेले. तेथेच ही शेळी त्याने फस्त केली. या बिबट्याच्या दहशतीने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.