पुणे – “निसर्ग’ चक्रीवादळाचा पुणे परिमंडलातील वीजयंत्रणेला तडाखा बसला. प्राथमिक अंदाजानुसार पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात उच्च व लघुदाबाचे 1440 वीजखांब जमीनदोस्त झाले. तसेच, अनेक ठिकाणी झाडे व फांद्या पडून वीजतारा तुटल्या.
महावितरण अभियंते व कर्मचाऱ्यांनी गेल्या 24 तासांमध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह ग्रामीण भागातील बहुतांश वीजपुरवठा पूर्ववत केला. शहरी भागात अनेक भूमिगत वाहिन्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे वीजपुरवठा सुरू करण्यात अडथळे आले. मात्र, गुरुवारी पहाटेपर्यंत बहुतांश भागातील वीजपुरवठा सुरू केला.
पुणे शहरात 45 उच्च व लघुदाबाचे वीजखांब कोसळले. महावितरणकडून लगेचच दुरुस्ती कामाला सुरुवात करण्यात आली. पहाटेपर्यंत दुरुस्ती तसेच पर्यायी व्यवस्थेद्वारे टप्प्याटप्प्याने बहुतांश भागात वीजपुरवठा सुरू केला. भूमिगत वाहिन्या व फिडर पिलरमध्ये पाणी शिरणे, मोठी झाडे व फांद्या हटविण्यास विलंब होणे आदी कारणांमुळे गुरुवारी दुपारपर्यंत आंबेगाव, सहकारनगर व मार्केट यार्डमधील काही भाग, जनता वसाहत, बाणेरमधील काही भाग, येवलेवाडीमधील फॉर्च्यून सृष्टी, फॉर्च्यून शुभम, पद्मकुंज, हडपसरमधील गंगा व्हीलेज, विमाननगर व विश्रांतवाडीमधील काही सोसायट्या आदी भागांमध्ये वीजपुरवठा खंडित होता. सायंकाळी उशिरा किंवा रात्रीपर्यंत या सर्व भागात वीजपुरवठा सुरू करण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड व भोसरीमध्ये 45 ठिकाणी वीजखांब कोसळले. चार ठिकाणी रोहित्र जमीनदोस्त झाले. अनेक ठिकाणी वीजतारा तुटल्या. त्यामुळे 112 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. यामध्ये गुरुवारी पहाटेपर्यंत बहुतांश भागातील वीजपुरवठा सुरू करण्यात आला. दुपारपर्यंत हिंजवडी, वाकडचा काही भाग, खराळवाडीमधील काही सोसायट्या, पिंपळे सौदागरचा काही भाग तसेच भोसरीमधील काही भागात दुरुस्तीची कामे सुरू होती. पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार यांनी वीजयंत्रणेची पाहणी व दुरुस्ती कामाला वेग देण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागात विविध ठिकाणी भेटी दिल्या.
वादळामुळे 175 ठिकाणी झाडपडीच्या घटना
शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असणाऱ्या पावसाने शुक्रवारी दुपारनंतर विश्रांती घेतली. वादळामुळे तब्बल 175 ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या. ही झाडे हलविण्याचे काम दिवसभर सुरू होते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुणे शहरात पावसाचा जोर आणखी चार ते पाच दिवस राहणार आहे. निसर्ग चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाला असला तरी त्यामुळे शहरात विविध ठिकाणी मोठे नुकसान झाले. शहरात तब्बल 60 ते 70 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे शहरात झाडे पडण्याच्या 175 घटना घडल्या असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली. बुधवारी पावसाचा जोर जास्त असल्याने पडलेली झाडे हटविणे शक्य झाले नाही. परंतु, जोर कमी झाल्यानंतर हटवण्याची कामे करण्यात आली.