केडगाव – बोरीपार्धी (ता. दौंड) गावात गुरूवार (दि. 30 एप्रिल) ते रविवार (दि. 3 मे) या कालावधीत चार दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. सोमवारी (दि. 27) बोरीपार्धी आपत्ती व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायत केडगाव यांच्यात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सरपंच अजित शेलार यांनी दिली.
या काळात केवळ दवाखाने, हॉस्पिटल, मेडिकल आणि दुध संकलन सेवा सुरू राहतील. या व्यतिरिक्त कोणताही व्यवहार सुरू राहणार नाही, त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कलम 144 आणि 188 अंतर्गत कारवाई करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाने दिल्या असल्याचे उपसरपंच सुनील सोडनवर यांनी सांगितले.