सहकार्य करण्याचे आवाहन
पुणे – करोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी विविध आघाड्यांवर प्रयत्न सुरू असले, तरी पुण्यातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. त्यामुळे शहरातील खासगी रुग्णालयांचे मोठे सहकार्य आवश्यक आहे. तेव्हा आपण पुढे येऊन सहभागी व्हावे. रुग्णांच्या उपचार आणि नियमांनुसार शुल्क अदा करण्यात येईल, असे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात शहरातील प्रमुख रुग्णालयाच्या डॉक्टरांबरोबर बैठक झाली. डॉक्टरांशी चर्चा करताना डॉ.म्हैसेकर म्हणाले, दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येकाने मास्क वापरणे आवश्यक आहे. छोट्या-छोट्या बाबी फार महत्त्वाच्या असतात.करोना विषाणूची लागण होणार नाही, याची दक्षता सर्वांनी घेण्याची गरज आहे.
सामाजिक बांधिलकी म्हणून सर्वांनी एकदिलाने काम करण्याची आवश्यकता आहे. करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणणे गरजेचे आहे. आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांना चांगली सेवा द्या. प्रशासनाकडून सहकार्य केले जाईल. पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी पुढील काळात डोळ्यांत तेल घालून काम करावे लागणार आहे.
सिम्बायोसिस व भारती विद्यापीठाच्या हॉस्पिटलबरोबर महापालिकेने करार केलेला आहे. रुग्णांच्या उपचारार्थ शासनाच्या योजनेअंतर्गत निधी मिळेल आणि उर्वरित रक्कम महापालिका देईल. फक्त आपल्याकडे आयसीयू बेड किती आहेत, शिल्लक किती आहेत, याबाबत अद्ययावत माहिती रुग्णालयाने देत राहावी.
आलेल्या रुग्णांची गैरसोय होऊ नये. भविष्याचे नियोजन करून निर्णय घ्यावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे शहरातील गंभीर परिस्थितीबाबत जाणीव करून दिली. तसेच आरोग्याच्या संबंधाने शासनाच्या योजनेबाबत माहिती दिली.