सातारा – खुनाचा प्रयत्न, जबरी चोरीप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यातील डीबी पथकाने लल्लन जाधवसह चौघांना आज अटक केली. मोक्का खटल्यात तुरुंगात असलेल्या गुंड दत्ता जाधवचा लल्लन जाधव मुलगा आहे. अजय ऊर्फ लल्लन दत्तात्रय जाधव (वय 28), ऋषिकेश ऊर्फ डोंगुल्या नाना कांबळे (वय 23), सर्जेराव ऊर्फ छोट्या पांडुरंग कांबळे (वय 20, तिघेही रा. प्रतापसिंहनगर, सातारा), विलास ऊर्फ यल्या शरणाप्पा कुरमणी (वय 22, रा. वनवासवाडी, सातारा) यांनी अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, लल्लन जाधवने सातारा शहरातील भंगार व्यावसायिक विक्रम आशरू वाघमारे (रा. संगमनगर, सातारा) याला “तुझ्यामुळे माझा बाप मोक्क्याच्या केस खटल्यामध्ये जेलमध्ये आहे. त्याला तू जबाबदार आहे’ अशी धमकी देऊन त्याला जेलमधून बाहेर काढण्यासाठी पाच लाख रूपयांची खंडणी मागितली.
ती रक्कम दिली नाही तर जिवंत ठेवणार नसल्याची धमकीही दि. 3 जून रोजी दिली होती. त्यानंतर रात्रीच्या सुमारास लल्लनने त्याच्या अन्य साथीदारांमार्फत वनवासवाडी विक्रम वाघमारे याला जीवे मारण्याचे हेतूने त्याच्यावर धारदार हत्याराने वार करून गंभीर जखमी केले. तसेच त्याच्या खिशातील पैसे जबरदस्तीने काढून घेऊन ते पळून गेले होते.
लल्लन नुकताच मोक्का खटल्यामधून जामिनावर बाहेर आला होता. त्याने त्याच्या अन्य साथीदारामार्फत परिसरामध्ये दहशत निर्माण केली होती. त्यास पकडणे पोलिसांसमोर आव्हान होते. पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, पोलीस उपअधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी यांनी त्यास तात्काळ पकडण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांना सूचना दिल्या होत्या. हेमंतकुमार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने सातारा, पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी जाऊन संशयितांचा शोध घेतला. ते जत तालुक्यातील एका डोंगर कपारीत आसरा घेऊन राहत असल्याबाबत माहिती मिळाली. संशयित अत्यंत खूनशी व सराईत असल्याने त्यांना पकडण्यासाठी दोन पथक तयार केली होती.
पथकातील काही पोलिसांनी विशिष्ट वेशभूषा करून संसयितांच्या ठावठिकाणाची माहिती घेतली. परंतु, त्याठिकाणी जाताना काळोख झालेला होता. ठिकाण अत्यंत निर्जन असल्याने संशयितांना चाहूल लागण्याची दाट शक्यता वाटू लागल्याने पथकाने डोंगर कपारीमध्ये ठिकठिकाणी रात्रीचे थांबून त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवले. संशयित डोंगरकपारीतून बाहेर येत असल्याची हालचाल दिसून आल्याने पोलीसांनी त्यांना चारही बाजूने घेरले. संशयित पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी त्यांना पाठलाग करून ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, हवालदार श्रीनिवास देशमुख, सुजीत भोसले, नाईक राहुल घाडगे, अविनाश चव्हाण, विक्रम माने, कॉन्स्टेबल गणेश घाडगे, संतोष कचरे, सागर गायकवाड, सुशांत कदम, विशाल घुमाळ यांनी ही कारवाई केली.