खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयातील प्रकार
पुणे – खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षांच्या कार्यालयात भांडणे सोडविताना बोर्डाचा माजी उपाध्यक्ष व विद्यमान सदस्याने एका नागरिकाच्या डोक्यात खुर्ची घातली. ही घटना गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयात घडली.
दुर्योधन भापकर असे गुन्हा दाखल झालेल्या सदस्याचे नाव आहे. याप्रकरणी नितीन शिंदे (वय 39, रा. गवळीवाडा, खडकी) यांनी फिर्याद दिली.
सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंदे यांच्या घराशेजारी एका डॉक्टरचे क्लिनीक आहे. संबंधीत क्लिनीकच्या डागडुजीच्या कामावरून निर्माण झालेला वाद मिटविण्यासाठी शिंदे यांना खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयातील उपाध्यक्षांच्या कार्यालयामध्ये बोलवले होते. त्यावेळी बोर्डाच्या उपाध्यक्षांनी फिर्यादीस “तुमचा क्लिनीकच्या डागडुजीच्या कामाला विरोध आहे, असे लोकप्रतिनीधींचे म्हणणे आहे’, असे सांगितले.
त्यावेळी फिर्यादीने संबंधीत डागडीजीच्या कामाला आपला विरोध नसल्याचे उपाध्यक्षांना सांगितले. त्यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डाचा माजी उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य असलेल्या भापकरची फिर्यादीसमवेत बाचाबाची झाली.
त्यानंतर भापकरने फिर्यादीस शिवीगाळ करीत तेथील खुर्ची उचलून फिर्यादीच्या डोक्यात घालून त्यांना गंभीर दुखापत केली. त्याचबरोबर हाताने मारहाण करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, या घटनेमध्ये भापकर यानेही परस्परविरोधी फिर्याद दाखल केली.