पौड, (वार्ताहर) – नांदे (ता. मुळशी) येथील माजी आदर्श सरपंच व पुणे जिल्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत रानवडे यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
देशात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. अशातच संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाची पवार घराण्यातील अंतर्गत वादामुळे देशभर चर्चा आहे. मुळशी तालुका प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला समजला जातो. याआधी मुळशीतील अनेक कार्यकर्ते अजित पवार गटात सामिल झाले आहे.
त्यातच काल पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत रानवडे यांनी आपल्या समर्थकांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुंबई येथील देवगिरी या निवासस्थानी भेट घेत पक्ष प्रवेश केला. यावेळी नांदे गावातील माजी आदर्श सरपंच प्रशांत रानवडे यांच्या समवेत गावातील विविध पदाधिकारी ग्रामस्थांनी अजित पवार भेट घेऊन त्यांना कामासंदर्भात निवेदन दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकर त्या समस्या आपण स्वतः काळजी घेऊन सोडवणार असे आश्वासन दिले. यावेळी पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे आदी उपस्थित होते. प्रशांत रानवडे यांच्या समवेत गावातील आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्ती समिती सदस्य, शाळा समिती सदस्य आदींनी अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्षात जाहीर प्रवेश केला.