चंदीगड : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्यांच्या नव्या पक्षाचे नाव जाहीर केले आहे. कॅप्टन यांच्या नव्या पक्षाचे नाव ‘पंजाब लोक काँग्रेस’ असे ठेवण्यात आले आहे. यासोबतच अमरिंदर सिंग यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून काँग्रेसचा राजीनामा दिला आहे.
नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात करण्याचा निर्णय
पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्याशी झालेल्या वादामुळे पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात करण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. नवीन पक्षाच्या घोषणेआधी शनिवारी काँग्रेससोबत पडद्यामागच्या चर्चेचे वृत्त कॅप्टन यांनी फेटाळून लावले आहे. कॅप्टन म्हणाले होते की आता काॅंग्रेससोबत राहण्याची वेळ संपली असून पक्ष सोडण्याचा निर्णय अंतिम आहे. अमरिदर सिंग यांनी आपला राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा आधीच केली होती.
दरम्यान, राजीनामा देताना कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वड्रा यांच्यासह पक्षावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.