नवी दिल्ली – पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी सोमवारी अपेक्षेप्रमाणे भाजपमध्ये प्रवेश केला. पंजाब लोक कॉंग्रेस हा पक्षही त्यांनी भाजपमध्ये विलीन केला. केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि किरेन रिजीजू यांच्या उपस्थितीत 80 वर्षीय अमरिंदर यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. त्यांच्या समवेत पंजाबमधील इतर काही नेत्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामध्ये अमरिंदर यांचे पुत्र रनिंदर आणि कन्या जयइंदर कौर यांचाही समावेश आहे.
राष्ट्रीय सुरक्षेविषयी भाजपची प्रशंसनीय वचनबद्धता त्या पक्षात प्रवेश करण्यामागील प्रमुख कारणांपैकी एक असल्याचे अमरिंदर यांनी म्हटले. पंजाबमध्ये काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीआधी कॉंग्रेसने अमरिंदर यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवले. त्यामुळे नाराज झालेल्या अमरिंदर यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकून नवा पक्ष स्थापन केला. त्या पक्षाने निवडणुकीत भाजपशी आघाडी केली. मात्र, अमरिंदर यांचा पक्ष एकही जागा जिंकू शकला नाही. आता ते भाजपवासी बनले आहेत.
पंजाबमध्ये भाजपचा राजकीय प्रभाव अल्प स्वरूपाचा आहे. अमरिंदर यांच्यासारख्या प्रभावी नेत्याच्या प्रवेशामुळे भाजप त्या राज्यात विस्तारण्याची योजना हाती घेऊ शकणार आहे.