नवी दिल्ली – केंद्रात आणि विविध राज्यांत सत्ता असणाऱ्या भाजपमध्ये इनकमिंगचे सत्र सुरूच आहे. इतर पक्षांतून भाजपमध्ये डेरेदाखल झालेल्या नेत्यांच्या भाऊगर्दीत माजी मुख्यमंत्र्यांची संख्याही वाढत आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. काही दिवसांपूर्वीच गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत कॉंग्रेसचा हात सोडून भाजपवासी बनले.
भाजपचा झेंडा हाती घेणाऱ्या माजी मुख्यमंत्र्यांची यादी लांबलचक आहे. त्या यादीत उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या दोन राज्यांचे मुख्यमंत्रिपद भूषवणाऱ्या एन. डी. तिवारी यांच्या नावाचाही समावेश आहे. त्याशिवाय, एस. एम. कृष्णा (कर्नाटक), विजय बहुगुणा (उत्तराखंड), एन. किरण रेड्डी (संयुक्त आंध्र प्रदेश), पेमा खांडू (अरुणाचल प्रदेश) यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे हेही भाजपमध्ये सक्रिय आहेत.