रोम : प्रेम आंधळं असतं असं म्हणतात आणि प्रेमाला वयाचं आणि काळाचाही बंधन नसतं असेही म्हटले जाते. या म्हणी सिध्द करण्याचे काम इटलीच्या माजी पंतप्रधानांनी केले आहे. आपल्या जिवनशैलीसाठी प्रसिद्ध असलेले इटलीचे माजी पंतप्रधान सिलवियो बर्लुस्कोनी यांनी इटलीच्या संसदेतील महिला खासदार मारता फॅसिना यांच्याशी लग्न केले आहे. या लग्न समारंभ सोहळ्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बर्लुस्कोनी यांचे वय तब्बल 85 असून मारताचे वय मात्र फक्त 32 आहे.
आपल्यापेक्षा वयाने 53 वर्षे लहान असणाऱ्या महिलेशी बर्लुस्कोनी यांनी लग्न केले आहे. बरलुस्कोनी यांची तब्बल 417 अब्ज डॉलर्सची संपत्ती असून त्यावर आता मारतालाही अधिकार मिळणार आहे. अर्थात बर्लुस्कोनी यांच्या या निर्णयावर त्यांचे कुटुंबीय नाराज झाले असल्यामुळे बर्लुस्कोनी आणि मारता यांच्या लग्नाला अजून पर्यंत अधिकृत दर्जा देण्यात आलेला नाही. विवाहाची नोंदणी अजून करण्यात आलेली नाही.
मारताशी लग्न करण्यापूर्वी बर्लुस्कोनी फ्रान्सेस्का फर्सले या महिलेसोबत रहात होते. या महिलासोबत त्यांचे बारा वर्ष प्रेमसंबंध होते पण मारताशी ओळख झाल्यावर त्यांनी त्या महिलेशी प्रेम संबंध तोडले आणि मारताशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. इटलीच्या राजकारणातील महत्त्वाचे नाव असणाऱ्या बरलुस्कोनी नेहमी चर्चेत असतात. यापूर्वी एका वेश्येच्या प्रकरणांमध्येही त्यांच्यावर कारवाईची वेळ आली होती. त्या शिवाय करचुकवेगिरी करण्याबाबतही त्यांच्यावर कारवाईची सुरुवात करण्यात आली होती. त्यांच्या आरोग्याविषयी उलटसुलट बातम्या प्रसिद्ध होत आहेत.
बर्लुस्कोनी यांचे वय 85 असल्यामुळे त्यांचे आरोग्य व्यवस्थित नाही अशा बातम्याही इटलीच्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत आहेत. पण बर्लुस्कोनी आपल्या नव्या वधु सोबत नुकतेच एका हॉटेलातून बाहेर येताना दिसल्याची छायाचित्र प्रसिद्ध झाल्याने बर्लुस्कोनी आपल्या नव्या विवाहामध्ये खुश असल्याचेही समोर येत आहे.