पणजी – भारतीय जनता पार्टीचे विधानसभेचे सदस्य रमेश तवडकर यांची आज गोवा विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तवडकर यांनी कॉंग्रेसचे उमेदवार अलेक्सो सिक्वेरा यांचा 24 विरूद्ध 15 मतांनी पराभव केला. कालच प्रमोद सावंत यांनी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर सलग दुसऱ्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आज सभापती पदाची निवडणूक झाली.
40 सदस्यीय राज्य विधानसभेत 20 जागा जिंकून भाजपने सरकार स्थापन केले आहे. कॉंग्रेसला 11 जागांवर समाधान मानावे लागले आहे. भाजपला गोव्यातील बहुमताच्या आकड्यापेक्षा ती एक जागा कमी पडली, परंतु महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि अपक्ष उमेदवारांच्या मदतीने त्यांनी राज्यातील सत्ता राखली आहे. सभापतीपदी निवडून आलेले तवडकर हे विधीमंडळ कामकाजाचे अनुभवी सदस्य आहेत.