Ramtek Lok Sabha – येथे एका नवरदेवाने बोहल्यावर चढण्यापूर्वी त्याचा मतदानाचा हक्क बजावला आहे. घोड्यावर बसण्यापूर्वी त्याने मतदान केंद्रावर मतदान केले. आधी मतदान मगच लगीन.. अशा त्याच्या बाण्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
स्वप्नील डांगरे असे त्या तरूणाचे नाव आहे. रामटेकमध्ये या तरुण मतदाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अंगात शेरवानी, डोक्यावर पगडी, कपाळाला मुंडावळ्या अशा वेशातील स्वप्नील हा नवरदेव मतदान केंद्रावर पोहोचताच त्याच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या.
योग्य लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी आपण मतदान केले अशी प्रतिक्रिया स्वप्नीलने यावेळी दिली याशिवाय जास्तीत जास्त लोकांनी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहनही स्वप्नीलने नागरिकांना केले. नवरदेवाचा हा उत्साह पाहून लोकं त्याचे कौतुक करत आहेत.
रामटेकमध्ये महायुतीचे राजू पारवे विरुद्ध महाविकास आघाडीचे श्यामकुमार बर्वे अशी लढत आहे. आज देशातील लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाला आज सुरुवात झाली. या उत्सवासाठी सकाळपासून मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी रांगा लागल्या होत्या.
मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त –
पूर्व विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर मतदारसंघांत शुक्रवारी मतदान झाले. तर अनेक मोठ्या नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
तसेच मतदान केंद्रावर कुठलाही अनूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. नक्षलग्रस्त भागात पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे.