पुणे – विस्ट्रा आयटीसीएल लिमिटेड कंपनीचे कर्ज बुडविल्याप्रकरणी उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर झालेल्या सुनावणीत माजी खासदार संजय काकडे यांच्या काकडे कन्स्ट्रक्शन कंपनी प्रा. लि. कंपनीच्या शेअर्सची विक्री करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी हे आदेश दिले आहेत.
याप्रकरणी विस्ट्रा आयटीसीएल लिमिटेड कंपनीने माजी खासदार संजय काकडे यांच्यासह इतरांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 4 जुलै रोजी होणार आहे.
अगोदर डीएचएफएल बॅंक कर्ज बुडविल्याप्रकरणी उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर झालेल्या सुनावणीत काकडे यांच्या शिवाजीनगर येथील भांबुर्डा येथील शिवाजी हौसिंग सोसायटीतील 7 हजार 440 चौरस फूट प्लॉटचा प्रत्यक्ष ताबा तर यशवंत घाडगे नगर येथील संजय काकडे यांच्या बंगल्याचा प्रतीकात्मक ताबा घेण्याचे आदेश देण्यात आले होते.
विस्ट्रा आयटीसीएल कंपनीद्वारे मुंबई हायकोर्टात दाखल याचिकेवर सुनावणीत काकडे यांच्या काकडे कन्स्ट्रक्शन कंपनी प्रा. लि. कंपनीच्या शेअर्सची विक्री करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत कोर्टाने शेड्युलपण दिले होते. आता याप्रकरणी 4 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
दरम्यान, एचडीएफसी व्हेन्चर्स ट्रस्टी कंपनीनेही काकडे यांच्या काकडे इस्टेट डेव्हलपर्स प्रा. लि. विरोधात 133 कोटी 75 लाख रुपयांचे कर्ज बुडविल्याप्रकरणी एनसीएलटीकडे याचिका दाखल केली होती. त्यातही एनसीएलटीने कंपनीची दिवाळखोरी जाहीर करण्याचे आदेश काही दिवसापूर्वी दिले आहेत.
786 कोटी रुपयांचे कर्ज थकवले
विस्ट्रा आयटीसीएल लिमिटेड कंपनीने माजी खासदार संजय काकडे यांच्यासह इतरांविरोधात कर्ज बुडविल्याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयात दाखल याचिकेत विस्ट्रा कंपनीने काकडे यांच्याकडे 786 कोटी रुपयांचे कर्ज थकित असल्याचा दावा केला आहे.