पुणे – माजी खासदार संजय काकडे यांच्या भाऊ, भावजयसह तीन पुतण्यांना दोन विवाहितांचा छळ केल्याप्रकरणी अटकपूर्व जामीन मंजुर झाला आहे. दोन सख्या बहिणींचा विवाह संजय यांच्या पुतण्यांशी झाला आहे. दोघींनी दिलेल्या वेगवेगळ्या फिर्यादीनुसार कोथरूड पोलिसांनी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केला आहे.
भाऊ सुर्यकांत दत्तात्रय काकडे (वय 64) भावजय, पुतणे जय, विजय (दोघांचे वय 24) आणि अजय (वय 19) अशी जामीन झालेल्यांची नावे आहेत. बचाव पक्षातर्फे ऍड. हर्षद निंबाळकर, ऍड. सुधीर शहा, ऍड. शिवम निंबाळकर आणि ऍड. राहुल भरेकर यांनी काम पाहिले.
दोघी बहिणींना मारहाण करून, सणाला सोने मागून शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यात आला. तसेच दोघींना मुलगा व्हावा, यासाठी गुरूजींनी मंत्रून दिलेले पावडरचे अस्वच्छ बेचव पाणी पिण्यास भाग पाडले.
बेडखाली नाव लिहिलेले लिंबु ठेवून वश करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात पाच जणांना जामीन मंजुर आहे. 14 मे ते 12 डिसेंबर 2021 या कालावधीत हा प्रकार घडला.